

पिंपरी : नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने रिमोट ऑपरेटेड रोबोटिक वॉयर कॉर्फ्ट हे एक मशिन खरेदी केले आहे. त्यासाठी महापालिकेने 15 लाख रुपये खर्च केले आहे.
अग्निशमन विभागाचा विरोध असताना केवळ राजकीय दबावामुळे हे आपत्कालीन प्रसंगी वापरासाठी मशिन खरेदी करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
शहरातून पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविण्याचे काम हे मशिन करते, असा दावा संबंधित ठेकेदाराने केला आहे. त्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने निविदा प्रसिद्ध केली होती. त्याला व्हीएमसीसी इंडिया सर्व्हिसेस लिमिटेड, आदिका ऑटोमेशन आणि पंचरत्न फाउंडेशन या तीन एजन्सीचा प्रतिसाद लाभला. त्यात 0.24 टक्के कमी दराची व्हीएमसीसी इंडिया सर्व्हिसेस लिमिटेडची 14 लाख 86 हजार 401 रुपये दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधित एजन्सीकडून ते मशिन खरेदी करण्यात आले आहे.
मात्र, अग्निशमन विभागाने त्या मशिनची नदीपात्रात चाचणी घेतली होती. त्यात ते मशिन फायदेशीर नसल्याचे अग्निशमन विभागाने मशिन खरेदी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याऐवजी जेट बोट खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे नदीत सापडलेल्या व्यक्तीचा वेगाने व सुरक्षितपणे बचाव करता येईल. मात्र, राजकीय दबाव असल्याने ते मशिन खरेदी करण्यात आले आहे. तसेच, ते मशिन बाजारपेठेपेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
शहरात तीन नद्या असल्याने केवळ एकच मशिन खरेदी करण्यात आले आहे. तसेच, तांत्रिक दृष्ट्या फायदेशीर नसलेलले मशिन अग्निशमन विभागाचा विरोध झुगारून खरेदी करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.