पिंपळे गुरव: सृष्टी चौक ते कल्पतरू या मुख्य मार्गावर स्ट्रॉम वॉटर चेंबरच्या अगदी शेजारील सिमेंटचे गट्टू उखडून खड्डा तयार झाला असून, या खड्ड्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी प्रकाश कमी असल्याने हा खड्डा दिसत नाही आणि खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
वाहनचालकांची गैरसोय
कल्पतरू सिग्नलजवळील हा चेंबर रस्त्यावरील गर्दीच्या ठिकाणी असल्याने या मार्गावरून वाहनांची सततची वर्दळ असते. नोकरदार, व्यापारी, दुकानदार, ज्येष्ठ नागरिक तसेच रिक्षा आणि दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. शिवाय भोसरी एमआयडीसी पिंपरी, कासरवाडी रेल्वे स्टेशन, नाशिक फाटा मेट्रो स्टेशनकडे जाण्यासाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या मार्गावर पीएमपी बससेवाही चालत असल्याने प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात रस्ता दुरुस्तीची कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तरीही या खड्ड्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. स्थापत्य विभागाने तातडीने हा खड्डा बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून अपघाताचा धोका कमी होऊन सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कल्पतरू सिग्नल शेजारील रस्त्यावरील स्ट्राँम वॉटर चेंबरच्या बाजूचे पेव्हिंग ब्लॉक खचले होते. त्यामुळे तो चेंबर खाली गेला होता, दुरुस्तीचे काम सुरू आहे.चंद्रकांत पाटील, कनिष्ठ अभियंता, मनपा
दररोज ऑफिसला जाताना हा खड्डा नजरेस पडतो. दोन वेळा घसरून पडायची वेळ आली होती. एवढ्या गर्दीच्या चौकात असा खड्डा असणे म्हणजे थेट अपघाताला आमंत्रणच आहे.वाहनचालक