वर्षा कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे जानेवारी 2023 मध्ये जल्लोष शिक्षणाचा उपक्रम घेण्यात आला. स्पर्धेत पालिकेच्या आठ शाळा मॉडेल शाळा ठरल्या. या आठ शाळांना लाखो रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले. एकूण पाच कोटी रुपयांची बक्षिसे या शाळांना देण्यात आली. मात्र, ही रक्कम प्रत्यक्षात शाळांच्या खात्यात जमा न करता त्या त्या क्षेत्रिय कार्यालयात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांची दुरवस्था कायम असल्याचे चित्र आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नावीन्यपूर्ण विचार वाढीसाठी शालेय स्तरावर जल्लोष शिक्षणाचा स्पर्धेचे आयोजन जानेवारी 2023 मध्ये चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले होते. महापालिकेच्या सुमारे 129 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमात आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या एका शाळेची निवड मॉडेल शाळा म्हणून करण्यात आली.
एकूण आठ शाळा मॉडेल शाळा ठरविल्या. यापैकी सर्वोत्कृष्ट शाळेस 1 कोटी रुपये 50 लाख आणि इतर सात शाळांना 50 लाखांचे बक्षीस देण्यात आले. मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून 25 टक्के रक्कम शाळेच्या विकासावर खर्च करण्याचा शाळांना अधिकार देण्यात आले. उर्वरित 75 टक्के रक्कम शाळेस मॉडेल स्कूल बनविण्यासाठी खर्च केली जाणार होती. शिक्षण विभागाने या विजेत्या शाळांतील सुविधांवर खर्च करणे अपेक्षित आहे; मात्र यातील अनेक शाळांची परिस्थिती आजही ‘जैसे-थे’ असल्याचे चित्र आहे.
जल्लोष शिक्षणाचा अंतर्गत निवडलेल्या काही मॉडेल शाळा पत्राशेेडमध्ये भरत आहेत, तर काही शाळांत जागेअभावी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे नाहीत.
सोनावणेवस्ती शाळांमध्ये वर्गखोल्यांची संख्या कमी. बक्षिसामधून वर्गखोल्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
फकिरभाई पानसरे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची गरज;
हुतात्मा चापेकर शाळेची इमारत जुनी झाली आहे. शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.
वैष्णोमाता प्राथमिक शाळेस 1 कोटी 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले; मात्र अर्धी शाळा पक्क्या इमारतीत तर अर्धी शाळा पत्राशेडमध्ये भरते; तसेच शाळेस मैदान नाही.
बक्षिसाच्या रकमेतून क्षेत्रिय कार्यालयाकडून शाळांच्या रंगरंगोटीसाठी खर्च करण्यात आला आहे. हा खर्च बक्षीसपात्र नसलेल्या शाळांसाठी देखील करण्यात येतो. तसेच वर्गात बेंच आणि क्रीडा साहित्य हे पुरविणे पालिकेचे काम आहे. तर मग बक्षिसाच्या रकमेतून ही कामे का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संगीत वाद्य साहित्यावर खर्च करण्यात आला आहे; परंतु पालिका शाळांत संगीत शिक्षक आहेत का? या वादन साहित्यांचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होणार, असाही प्रश्न उपस्थित होतो.
वैष्णवमाता प्राथमिक शाळा, इंद्रायणीनगर
(1 कोटी 50 लाखांचे बक्षीस)
फकीरभाई पानसरे उर्दू शाळा, चिंचवड
हुतात्मा चापेकर शाळा, चिंचवडगाव
पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्र. 54
काळजेवाडी प्राथमिक शाळा, चऱ्होली.
सोनावणे वस्ती प्राथमिक शाळा
यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा, थेरगाव
संत तुकारामनगर शाळा, पिंपरी
जल्लोष शिक्षणाचा स्पर्धेवेळी माझ्याकडे शिक्षण विभागाचा पदभार नव्हता. मी शाळांची यादी मागवली आहे. त्यानुसार, कोणत्या शाळांची काय मागणी होती; तसेच त्यातील किती कामे पूर्ण झाली आहेत व या कामावर किती खर्च झाला? याविषयी माहिती घेत आहे.किरणकुमार मोरे (सहायक आयुक्त, शिक्षण विभाग पिं.चि.मनपा,)