Innovation In PCMC Schools Pudhari
पिंपरी चिंचवड

Innovation In PCMC Schools: पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे धडाकेबाज नवोपक्रम!

ATL–पायजम–कल्पकघरमुळे विद्यार्थ्यांची नवनिर्मिती झळकली; संरक्षण अलार्म ते ड्रेनेज अलर्ट सिस्टीमपर्यंत भन्नाट प्रकल्प

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती व कल्पकतेला चालना मिळून नवकल्पनांचा पुरस्कार करणारे उद्याचे संशोधक घडावेत, या उद्देशाने पालिकस शाळांमध्ये ‌‘पायजम‌’, ‌‘अटल टिंकरिंग लॅब‌’ आणि चिंचवड येथील ‌’कल्पकघर‌’ उपलब्ध करण्यात आले आहे. या गोष्टींचा वापर करून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या यंत्रणांची मॉडेल्स सादर केली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील 13 शाळांमध्ये या लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळा 3 डी प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्स सायन्समधील नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करता येत आहे. तर काही शाळांमध्ये पायजम नावाच्या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना कोडिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. सोनवणे वस्ती शाळेत आठवड्यातून दोन दिवस संस्थेचे प्रशिक्षक 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना कंप्यूटर सायन्स, कम्प्युटेशनल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिएटिव्ह कम्प्युटिंगचे प्रशिक्षण देत आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर उपाययोजना तयार करायची आहे. प्रत्येक गटाने आपापल्या समस्यांचे निराकरण करणारी आकर्षक मॉडेल्स बनवून नवकल्पना प्रत्यक्षात उतरवयाच्या आहेत.

प्रोटेक्शन अलार्म सिस्टिम

बऱ्याचदा शेतीमध्ये जनावरे शिरून पिकांचे नुकसान करतात, ही ग््राामीण भागातील सामान्य समस्या विद्यार्थ्यांनी ओळखून यावर उपाय म्हणून सातवी मधील विद्यार्थी सनी कुमार, शौर्य उके, अंशुमन शाह यांनी डिस्टन्स सेन्सर वापरून एक अलार्म सिस्टम तयार केली. प्राणी शेताच्या जवळ आले की सेन्सर सक्रिय होतो, बझर वाजतो आणि दिवे लुकलुकू लागतात, त्यामुळे जनावरे घाबरून पळून जातात. हा साधा पण परिणामकारक प्रकल्प शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकतो.

ॲटोमेटिक सिंचन प्रकल्प

पिंपरीतील पालिकेच्या कमला नेहरू हिंदी माध्यमाच्या शाळेतील अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून इयत्ता आठवीतील अजय गौतम आणि राहुल रामया ॲटोमेटिक सिंचन प्रकल्प तयार केला आहे. काही ठिकाणी भौगोलिक परिस्थिनुसार पावसाचे प्रमाण कमी असते. अशावेळी पिकांचे नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतातील उत्पन्न वाढविण्यासाठी तयार केला आहे. या प्रकल्पास हॅकेथॉन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीसही मिळाले आहे,

स्मार्ट लाईट, फॅन सिस्टिम

वीज वाया जाण्याची समस्या विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिली होती. लोक घराबाहेर पडताना लाईट आणि फॅन बंद करायला विसरतात, याची दखल घेत इयत्ता सातवीतील योगीराज आढे या विद्यार्थ्याने ‌’स्मार्ट लाइट - फॅन सिस्टम‌’ तयार केली. या प्रकल्पात खोलीत कोणी व्यक्ती असल्यास लाईट व फॅन आपोआप सुरू होतात आणि कोणी नसल्यास आपोआप बंद होतात. हा छोटा पण प्रभावी उपाय घरगुती वीज बचतीसाठी मोठे पाऊल ठरू शकतो.

ड्रेनेज अलर्ट सिस्टीम

इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ड्रेनेज अलर्ट सिस्टीम या प्रकल्पाला कुलेस्ट प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोडींग विथ कमिटमेंट या प्रकारात विशेष पुरस्कार मिळाला आहे. इंद्रायणीनगर शाळेतील नैतिक इहारे, श्रावस्ती गायकवाड, निकिता थिटे आणि निकिता वाघचौरे या विद्यार्थ्यांनी गटारे तुंबून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याने बघितले. या समस्येवरील उपाय म्हणून त्यांनीं वॉटर फ्लो सेन्सॉर आणि पायथन कॉम्प्युटर लँग्वेजचा उपयोग करुन प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाद्वारे गटार तुंबल्याबरोबर अलार्म वाजतो आणि त्या संबंधातील संदेश थेट तहापालिकेच्या कार्यालयात तक्रार म्हणून नोंदविला जातो. विद्यार्थ्यांच्या या तहत्वाकांक्षी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे.

आम्ही पालिका शाळांबरोबर काम करत आहोत. यामध्ये समस्या निराकरण, संगणकीय विचासरणी, ए आय तंत्रज्ञान, डिजिटल सिटीझनशीप याबद्दल प्रशिक्षण देतो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत थेट काम केले जाते. यामध्ये शिक्षकांना देखील प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थी नवनवीन संकल्पना घेवून त्यावर आधारित प्रकल्प तयार करतात. जे त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत आणि भविष्यातदेखील याचा उपयोग होणार आहे.
रोहन एरन ( प्रकल्प अधिकारी, पायजम)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT