

पिंपरी: शहरातील शिधापित्रकाधारकांना कार्यालयातील हेलपाटे कमी करण्यासाठी आणि सुलभ शिधापत्रिका मिळावी, यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. त्यातचा आता राज्य शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) पोर्टलवर नागरिकांना लॉगिन करून आपली शिधापत्रिका डाऊनलोड करता येणार आहे. कार्यालयाकडून सही आणि शिक्का दिला जातो. त्यामुळे नागरिकांना दुबार व तातडीने शिधापत्रिका उपलब्ध होते. परिणामी, शिधापत्रिकाधारकांचे हेलपाटे वाचले आहेत.
शिधापत्रिका दुबार काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. पूर्वी प्रत्येक कार्यालयांतर्गत महिन्याकाठी 200 अर्ज शिधापत्रिकेच्या दुबार प्राप्तीसाठी येत होते; परंतु आता ही संख्या केवळ 70 वर आली आहे. शिधापत्रिका गहाळ झाल्यास अथवा इतर कारणांमुळे दुबार शिधापत्रिका (दुय्यम प्रत) काढण्याची आवश्यकता असलेल्या नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका सहजपणे प्राप्त होत आहे.
नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका कशी डाऊनलोड करायची हे माहिती नसलेल्या काही नागरिकांनाच आता अधिक चौकशीसाठी कार्यालयाकडे येणे होत आहे; मात्र या समस्येचे निराकरण कार्यालयामध्ये तत्काळ शिधापत्रिका देऊन केले जात आहे. या ऑनलाइन व्यवस्थेमुळे, ज्या नागरिकांना शिधापत्रिका गहाळ झालेली असते, त्यांना आणखी तासनतास कार्यालयाच्या बाहेर उभे राहण्याची गरज नाही. शिधापत्रिका काढण्याची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि त्वरित झाल्यामुळे सरकारी कामकाजात आणखी पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा संचार झाला आहे.
घरबसल्या मिळणार शिधापत्रिका
शिधापत्रिका काढण्याासाठी आता कार्यालयात येण्याची आवश्यकता नसून, घरबसल्यादेखील शिधापत्रिका मिळू शकते. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील अ आणि ज विभागाकडून त्याबाबत मार्गदर्शनदेखील करण्यात येत असून, शिधापत्रिका काढण्याबाबतची माहिती दर्शनी भागात लावली आहे. त्यामुळे कार्यालयातील ताणदेखील कमी झाला आहे.
ऑनलाईन प्रक्रियेमुळे नागरिकांना कोणत्याही ठिकाणी शिधापत्रिका उपलब्ध होते. त्यामुळे दुबार शिधापत्रिकेची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आली आहे. त्यात आणखी सुधारणादेखील सुरू आहेत.
विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी