Pimpri Chinchwad Traffic Buddy: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ट्रॅफिक बडी’ची धमक! 5,284 तक्रारी नोंद

नियमभंग 55%, 4,118 तक्रारींवर कारवाई; वाहतूक व्यवस्थापनात नागरिकांचा वाढता सहभाग उजागर
Traffic Buddy
Traffic BuddyPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढणारी वाहतूककोंडी अवैध पार्किंग नादुरुस्त सिग्नल, खड्डेमय रस्ते आणि अवजड वाहनांची घुसखोरी, अशा सर्व प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याचे लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने ‌‘ट्रॅफिक बडी‌’ ही व्हॉट्‌‍स ॲप प्रणाली नागरिकांच्या सेवेत आणली आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांनी 5,284 तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यापैकी 4,118 तक्रारींवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे.

Traffic Buddy
GST Input Credit Misuse: इनपुट क्रेडिट गैरव्यवहार रोखण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढे यावे : जीएसटी प्रधान आयुक्त

‌‘ट्रॅफिक बडी‌’ मुळे प्रक्रिया पारदर्शक

एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी यांच्या तांत्रिक सहकार्याने विकसित केलेली ही सेवा फक्त व्हॉट्‌‍स ॲपवर चालते. 8788649885 या क्रमांकावर संदेश पाठवल्यानंतर तक्रार नोंदणीची प्रक्रिया सुरू होते. भाषेची निवड, नावनोंदणी आणि मुख्य मेनूमधील पर्याय यानुसार नागरिकांना तक्रार प्रकार निवडण्याची सुविधा दिली आहे. तक्रारीसोबत फोटो आणि जीपीएस लोकेशन पाठवता येत असल्याने त्या थेट संबंधित वाहतूक विभागाकडे पोहोचतात. तक्रारीचा स्वीकार झाल्याची पावती आणि झालेल्या कारवाईची माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळते. यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होत असल्याचे अधिकारी सांगतात.

Traffic Buddy
Winter Temperature Drop Pune: राज्याला हुडहुडी! पुण्यात पाषाणमध्ये पारा ८.४ अंशांवर

नागरिकांचा सहभाग वाढतोय

या उपक्रमामुळे नागरिकांचा दृष्टिकोन बदलत असून, वाहतूक समस्यांकडे केवळ प्रशासनाची जबाबदारी म्हणून न पाहता त्यात सहभाग नोंदविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. दैनंदिन प्रवासात दिसणारे नियमभंग, वाहतुकीतील अडथळे किंवा रस्त्यांची दुरवस्था तात्काळ नोंदविण्याची सवय नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तक्रारींवर पोलिसांकडून वेळेवर कार्यवाही होत असल्याने नागरिकांचा विश्वास वाढत आहे. तसेच, वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या फोटोसह लोकेशन मिळत असल्याने नियमभंग करणाऱ्यावर चाप लावणे शक्य होत असल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. शहरातील गर्दीचे ठिकाण, सिग्नल तांत्रिक अडचणी, अडथळेमुक्त प्रवासासाठी आवश्यक दुरुस्त्या याबाबत मिळणारा डेटा वाहतूक नियोजनासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही अधिकारी सांगतात.

Traffic Buddy
Maharashtra Drama Competition Pune: राज्य नाट्य स्पर्धा: पुणे प्राथमिक फेरीत ‘कर्ण’ नाटकाला मानाचा पहिला क्रमांक

नियमभंग केल्याच्या 55 टक्के तक्रारी

नागरिकांनी केलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने वाहतूक नियमभंग, अवैध पार्किंग, खराब रस्ते, वाहतूककोंडी, अवजड वाहनांची निर्बंधित ठिकाणी घुसखोरी, नादुरुस्त सिग्नल आणि वाहतुकीतील अडथळ्यांबाबतच्या सूचना अशा तक्रारींचा समावेश आहे. यातील विशेष बाब म्हणजे 55 टक्के तक्रारी नियमभंग केल्याच्या आहेत. 22 टक्के तक्रारी अवैध पार्किंग संबंधातील आहेत. तर, 10 टक्के नागरिकांनी रस्ता खराब असल्याची माहिती दिली आहे. 6 टक्के तक्रारी वाहतूक कोंडीबाबत आहेत. 3 टक्के नागरिकांनी तक्रार करून उपाय सुचवले आहेत. 2 टक्के तक्रारी अवजड वाहनांच्या घुसखोरीबाबत आहेत. 1 टक्के तक्रारी वाहतुकीतील अनियमितता दर्शवत आहेत. तर, उर्वरित 1 टक्के नागरिकांनी सिग्नल नादुरुस्त असल्याचे पोलिसांना कळवले आहे.

Traffic Buddy
Niloo Phule Natyagruh Booking: निळू फुले नाट्यगृह मार्चपर्यंत हाऊसफुल्ल! 43 लाखांहून अधिक उत्पन्न महापालिकेत

इतर शहरांना आदर्श

शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नागरिकांकडून मिळत असलेली माहिती वाहतूक विभागासाठी महत्त्वाची ठरत आहे. मोठ्या संख्येत तक्रारी आल्याने नागरिकांची जागरूकता आणि सक्रिय सहभाग अधोरेखित होत आहे. पिंपरी-चिंचवडचा हा अनुभव इतर महानगरांसाठीही उपयुक्त ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

वाहतूक व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे. ‌‘ट्रॅफिक बडी‌’मुळे नागरिकांना तक्रारी नोंदवणे सोपे झाले असून नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास मदत मिळत आहे. यामुळे वाहतूक पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास आणखी दृढ होईल.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news