पिंपरी: शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक तसेच ऑनलाइन व्यवसाय करणार्यांसाठी भारतीय टपाल विभागाने मोठी ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे टपाल क्षेत्रामार्फत रिटेल पार्सल पिकअप सेवा आपल्या दारी या नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, आता ग्राहकांना पार्सल बुक करण्यासाठी टपाल कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
टपाल विभागाचे कर्मचारी ग्राहकांच्या घरातून, कार्यालयातून किंवा व्यावसायिक आस्थापनातून थेट पार्सल स्वीकारून त्याची नोंदणी करून देशातील कोणत्याही ठिकाणी सुरक्षितरीत्या पाठविणार आहेत. ही सेवा 1 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते झाले. ग्राहकांना अधिक सुलभ, जलद आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे या वेळी सांगण्यात आले. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन इंडिया पोस्ट सातत्याने आधुनिक सेवा देत आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि पार्सल बुकिंगची धावपळ कमी होणार असून, टपाल सेवा थेट नागरिकांच्या दारात उपलब्ध होणार आहे.
नागरिकांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही सेवा विशेषतः लघु उद्योजक, किरकोळ व्यापारी, ई-कॉमर्स विक्रेते, गृहउद्योग, महिला उद्योजक, स्वयंरोजगार करणारे नागरिक आणि नियमित पार्सल पाठविणार्या ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्राहकांच्या दारातूनच पार्सल स्वीकारून त्याचे सुरक्षित बुकिंग व देशभर विश्वासार्ह वितरण करण्यात येणार असल्याने व्यवसायालाही चालना मिळणार आहे.
उद्योजकांना मोठा फायदा
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांसह पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट, येरवडा, हिंजवडी आयटी पार्क, हडपसर, एनआयबीएम, कोंढवा, भोसरी आणि मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांनी या सुविधेसाठी 8421372317 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधावा. ग्राहकांना अधिक आधुनिक, सुलभ आणि विश्वासार्ह टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पुणे टपाल क्षेत्राने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, पिंपरी-चिंचवडमधील व्यापारी, उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांकडून या सेवेचे स्वागत होत आहे. टपाल विभागाने नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
सेवेचे प्रमुख लाभ
घर, कार्यालय किंवा व्यावसायिक ठिकाणांहून पार्सलसंकलन
टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही
सुरक्षित व विश्वासार्ह देशव्यापी पार्सलवितरण
वेळ आणि प्रवास खर्चाची बचत
जलद, सुलभ आणि ग्राहकाभिमुख सेवा
लघुउद्योजक, ई-कॉमर्स विक्रेते व महिला