पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. औद्योगिक आणि आयटी हब म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या हिंजवडी परिसरात दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. यामुळे नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सहा महत्त्वाचे जोडरस्ते विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
पीएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून काही भागांमध्ये संयुक्त मोजणीही पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकल्पाला प्राधान्य देत पावसाळ्यापूर्वी कामांची गती वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पीएमआरडीएच्या 2025-2026 च्या नियोजनात हिंजवडीसह चाकण, रांजणगाव, तळेगाव आणि पिरंगुट या औद्योगिक पट्ट्यांमधील दळणवळण सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 5,215 चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण कार्यक्षेत्रात येणाऱ्या नऊ तालुक्यांतील 674 गावांना सक्षम रस्ते नेटवर्कद्वारे जोडण्यात येणार आहेत.
वाहतूक व्यवस्थापन प्रभावी
हिंजवडीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीएने हाती घेतलेला हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. सहा नवीन जोडरस्त्यांमुळे पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे आणि वेगवान कामकाजामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन प्रस्तावित मार्ग
हिंजवडी परिसरातील वाहतूक सुधारण्यासाठी पुढील सहा मार्ग विकसित केले जाणार आहेत:
(1) सूर्या हॉस्पिटल ते ठाकरवस्ती
(2) ठाकरवस्ती ते माणगावठाण
(3) नांदेगाव ते मानगाव
(4) लक्ष्मी चौक - हिंजवडी - कोलते पाटील सोसायटी
(5) शनिमंदिर वाकड - मारुंजी
(6) जगताप चौक ते शिंदेवस्ती मारुंजी
हे सर्व मार्ग स्थानिक रहिवासी, आयटी कर्मचारी आणि औद्योगिक वाहतुकीसाठी मोठा दिलासा देणारे ठरतील.
आर्थिक विकासाला चालना मिळेल
हिंजवडी परिसरात रस्त्यांचे जाळे सक्षम झाल्यास केवळ वाहतूक सुलभ होणार नाही, तर औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल. ग््राामीण भागातील संपर्क सुधारल्याने रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढतील.
कडक प्रशासनिक भूमिका
प्राधिकरणाच्या आयुक्तांनी सुरू असलेल्या आणि प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेत कडक भूमिका घेतली असून, पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत; तसेच गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याबाबतही सूचना केल्या आहेत. कामाच्या अनुषंगाने अभियांत्रिकी विभागावर देखरेख वाढविण्यात आली असून, रस्ते निर्मिती कामाबाबत नियमित पाहणी आणि प्रगती अहवाल सादर करण्याचेही निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.
हिंजवडी येथील रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे; तसेच या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर हिंजवडीतील वाहतूककोंडी सुटू शकेल.शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए