संतोष शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी सरासरी पन्नास ते साठ खुनाच्या घटना घडतात. यातील काही खून पूर्ववैमनस्यातून, किरकोळ वादातून तर काही टोळीवादातून होत असल्याची नोंद आहे; मात्र अलीकडच्या काळात मित्रांनीच जिवलग मित्राचा खून केल्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ पालकांसाठी चिंता निर्माण करत आहे.
मैत्री ही गंगेसारखी निर्मळ, पवित्र आणि विश्वासाचा आधार मानली जाते. सुख-दु:खात एकमेकांना साथ देणाऱ्या या नात्याचा इतिहास कृष्ण-सुदामा यांच्या अजरामर मैत्रीने अधिक दृढ केला आहे; मात्र राज्यभरासह पिंपरी-चिंचवडमध्ये घडत असलेल्या अलीकडच्या घटनांमुळे हीच मैत्री कलंकित होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मागील वर्षी शहरात 73 खून, तर 134 खुनाचे प्रयत्न नोंदवले आहेत. यावर्षीच्या पहिल्या दहा महिन्यांत 56 खून आणि 161 खुनी हल्ल्यांची नोंद आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे अनेक प्रकरणांत आर्थिक वाद, आर्थिक व्यवहारातील फसवणूक तसेच अनैतिक संबंधाचा संशय, या कारणांवरून मित्रांनीच आपल्या मित्राचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे पोलिसांसह गुन्हेगारीचे सामाजिक विश्लेषण करणारे तज्ज्ञही चक्रावून गेले आहेत.
खून करणारे आरोपी अनेकदा घरच्यांची बदनामी होऊ नये, म्हणून पोलिसांसमोर किरकोळ कारणे सांगतात. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली की पोलिसही मुख्य कारण रेकॉर्डवर नोंदवण्याच्या फंद्यात पडत नाहीत; मात्र काही दिवसांतच खरा राग हा आर्थिक व्यवहार किंवा अनैतिक संबंधातून असल्याचे तपासात उघड होते. एखादा मित्र चुकीचा मार्ग स्वीकारत असताना त्याला रोखण्याऐवजी इतर मित्रांकडून मिळणारे प्रोत्साहनही खुनासारख्या टोकाच्या गुन्ह्यांना कारणीभूत ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशा घटनांमुळे तरुणांनी मैत्री करताना आणि मैत्री टिकवताना अधिक सजग राहण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनतेकडे वळत आहे. दारूच्या नशेत एकत्र जमलेले तरुण विचार न करता क्षणिक निर्णय घेतात आणि मैत्रीचे नाते गुन्हेगारीकडे झुकते. या प्रकारांवर पोलिसांचे सर्वंकष नियंत्रण शक्य नसून तरुणांचे समुपदेशन, पालकांकडून देखरेख आणि योग्य मार्गदर्शन हाच उपाय असल्याचे जाणकारांचे मत आहे.
अनेक आरोपींनी डोक्यात राग ठेवून कित्येक महिने मित्रांसोबत काढले. त्याच्यासोबत एकत्र फिरत, खाणेपिणे करत योग्य संधीची वाट पाहिली. कोणाला संशय येऊ नये म्हणून मित्राला निर्जन ठिकाणी नेण्याची योजना आखून, त्यानंतर निर्दयीपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
1) दारूच्या बिलावरून तळवडे येथे खून
दारूचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जणांनी मिळून मित्राचा खून केला. ही घटना तळवडेतील मसमाट गार्डनफ हॉटेलमध्ये घडली. गणेश लक्ष्मण पोखरकर (34, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांचा खून करण्यात आला. पोलिस शिपाई संतोष बांबळे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद विश्वनाथ मोरे, गोरख विष्णू कुटे, संतोष मराठे आणि चंद्रकांत दत्ता बुट्टे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
2) प्रेयसीसाठी मित्राचे मुंडके छाटले
58 वर्षीय आरोपीने आपल्या 48 वर्षीय मित्राला प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी भुलवून शेतात नेले. कोयत्याने मुंडके तोडून हत्या केली आणि मृतदेह रोटर मशीनमध्ये फिरवून स्वतःच्याच मृत्यूचा बनाव केला. हा प्रकार चऱ्होली गावात घडला. रविंद्र भिमाजी घेनंद (45) यांचा खून झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा निखिलने केली असून, आरोपी सुभाष ऊर्फ केरबा थोरवे याला पोलिसांनी अटक केली होती.
3) गिलबिले खून प्रकरणास आर्थिक
वादाची किनार
नितीन शंकर गिलबिले (37) यांचा आर्थिक वादातून मित्रांनीच गोळी मारून खून केला. अमित पठारे, विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली.
4) नकुल भोईर हत्या प्रकरणात
पत्नी, मित्र अटकेत
चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर (40) यांच्या खुनात पत्नी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार यांना अटक करण्यात आली. या घटनेत सिद्धार्थ हा नकुल याचादेखील मित्र होता.
5) अल्पवयीन मुलाकडून मित्राचा खून
ताथवडे येथे दारूच्या नशेत जवळच्या मित्रानेच एका तरुणाचा खून केला. पोलिस तपासात एका नातेवाईक महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.
6) केवळ अडीच हजारांसाठी खून
केवळ अडीच हजार रुपयांसाठी मित्रानेच तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याचा मृतदेह पेटवून दिला. अतिशय क्रूरपणे ही हत्या करण्यात आली होती. पिंपरी येथील एच. ए मैदानात ही घटना उघडकीस आली होती.
7) किरकोळ भांडणातून गळा आवळून हत्या
दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणातून मित्रानेच गळा आवळून एकाचा खून केला. ही घटना म्हाळुंगे येथील एका बांधकाम साईटवर उघडकीस आली. यामध्येदेखील संशयाची पाल चुकचुकल्याने खून झाला असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
8) बालमित्राने दगडाने ठेचले
दारूच्या नशेत एका सराईत गुन्हेगाराने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना शरदनगर, चिखली येथे उघडकीस आली. अतिशय क्षुल्लक कारणावरून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे मयत आणि आरोपी दोघेही बालमित्र होते.
9) दारूच्या बाटलीने गळा चिरला
हिंजवडी नजीकच्या मारुंजी येथे बियरच्या बाटलीने गळा चिरून खेळाडूचा खून करण्यात आल्याची नोंद आहे. स्केटिंगपटू मित्र आपल्या पत्नीशी चाट करीत असल्याचा संशय आरोपीला होता. त्यामुळे खून केल्याची कबुली त्याने दिली होती.
मित्रांनीच खून केल्याच्या घटना समोर येत आहेत. मुलगा कोणाच्या संगतीत फिरतो, मित्रांचे वागणे कसे आहे, ते घरी आल्यास त्यांची चौकशी करणे ही पालकांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. चुकीच्या संगतीत मुलगा भरकटत असल्यास वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे. तरुणांनीदेखील गुन्हेगारी वृत्ती असलेल्या मित्रांपासून दूर राहावे.शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड