

पुणे : वारजे परिसरातील रस्त्यावर झालेले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण एका तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल करताच महापालिका प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करीत दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे. तर संबंधित ठेकेदारावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावून पुन्हा तक्रार आल्यास थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरात महापालिकेचे ’खड्डेमुक्त’ अभियान जल्लोषात सुरू करण्यात आले होते. आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर रस्त्यांचा दर्जा सुधारेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र वारजेतील रस्त्यावर मातीवरच डांबर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दबाई न करता केलेल्या कामामुळे डांबराचे थर हातानेच निघत असल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास येताच तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी अहवालात ठेकेदाराची गंभीर चूक स्पष्ट झाल्याने त्याला दंडाची नोटीस बजावण्यात आली. तर या कामावर देखरेख करणाऱ्या कनिष्ठ व उपअभियंत्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील टिळक रस्ता, स्वारगेट, शुक्रवार पेठ, वाडिया रुग्णालय, कासेवाडी, राष्ट्रभूषण चौक, टिंबर मार्केट, रामोशी गेट आदी परिसरांतील रस्त्यांची अचानक पाहणी केली. रस्त्यांचे रिसर्फेसिंग करताना अधिक क्षेत्र व्यापल्यास दर्जेदार रस्ते तयार होतील, अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. हिराबागमधील डांबर कोठीत पाहणीदरम्यान सेन्सर पेव्हर ब्लॉकचा मोठा साठा न वापरता पडून असल्याचे त्यांनी पाहिले. तसेच कोठीत भंगार साठवलेले असून परिसरात अस्वच्छता असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि अधीक्षक अभियंता अशित जाधव उपस्थित होते.
वारजेतील प्रकारानंतर नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शहरात खड्डेमुक्त अभियान जोमात सुरू असताना अशा निकृष्ट कामांमुळे महापालिकेची प्रतिमा धोक्यात येत असल्याची नाराजी नागरिकांत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन खऱ्या अर्थाने दर्जेदार कामे करण्यासाठी किती काटेकोर उपाययोजना करेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.