

तानाजी गावडे
रावणगाव : ऐन हिवाळ्यात अनेक दिवसांपासून मानवी वस्तीत वाढलेले पक्ष्यांचे वास्तव्य आणि त्यांचा चिवचिवाट आता राजेगाव (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीकाठी पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दमदार पावसामुळे यंदा भीमा नदीचे पात्र तुडुंब भरले असून, या हिरव्यागार आणि जलसंपन्न परिसराने अनेक परदेशी पाहुण्यांना आकर्षित केले आहे. यामध्ये रोहित (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) आणि बदके, यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांच्या थव्यांनी नदीचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलवले आहे.
नदीपात्रात परदेशी पाहुण्यांची गर्दी हिवाळ्याच्या ओढीमुळे असली तरी यंदा मानवी वस्तीत पक्ष्यांचे वास्तव्य वाढले आहे. रानात खाण्यासाठी अन्न-धान्य सहज उपलब्ध होत नसल्याने पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, राजेगाव येथील भीमा नदीच्या पुलाजवळील नदीपात्र आता या पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरले आहे. या परदेशी पक्ष्यांच्या विलोभनीय थव्यांमुळे राजेगावच्या नदीच्या पुलावर प्रवासी आणि पर्यटक बराच वेळ थांबून नदीचे सौंदर्य आणि पक्ष्यांचे मनमोहक दृश्य न्याहाळताना दिसत आहेत.
यावर्षी राजेगाव परिसरात मुबलक पाऊस झाल्याने दुष्काळ अजिबात जाणवणार नाही, अशी परिस्थिती आहे. मुबलक पाण्यामुळे येथील परिसर हिरव्यागार शालूसारखा नटलेला असून, राजेगावची ओळख तालुक्यातील बागायती परिसर म्हणून झाली आहे. या नैसर्गिक संपन्नतेमुळेच येथे पक्ष्यांचे थवेच्या थवे येत आहेत. अनेक झाडांवर सुगरणीचे घरटे विणण्याचे काम ठिकठिकाणी चालू असल्याचे चित्र आहे. एकंदरीतच भीमा नदीच्या या पट्ट्यात आलेल्या परदेशी पक्ष्यांच्या आगमनामुळे आणि येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे राजेगावला ’पक्ष्यांचे माहेरघर’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. भीमा नदीचे हे पर्यटनस्थळ पर्यटकांना भुरळ पाडणारे ठरले आहे.