लोणावळा: श्रीक्षेत्र एकवीरा देवी देवस्थान परिसरातील विविध प्रलंबित मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात. तसेच, मंदिर परिसरात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला रोप वे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी वेहरगाव व दहिवली ग्रामस्थांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. पावसाची तमा न बाळगता लहान मुलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
वर्षांनुवर्षे मूलभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबित
एकवीरा देवी मंदिर परिसरात पायऱ्या, पायवाट, पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था यासारख्या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रश्नांबाबत संबंधित शासकीय विभागांकडे वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कार्ला फाटा ते श्री आई एकवीरा देवी मंदिर व गडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करावे, अशीही मागणी करण्यात आली. भाविकांसाठी सुरू असलेल्या पायऱ्यांच्या कामाची चौकशी करून ते काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
३ सप्टेंबरला सर्व विभागांची संयुक्त बैठक
रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांशी चर्चा केली. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. संबंधित सर्व शासकीय विभागांची संयुक्त बैठक गुरुवारी (दि. ३) घेऊन प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
...अन्यथा नवरात्रोत्सवात आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वेहरगाव-दहिवली ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
वेहरगाव-दहिवली ग्रामस्थांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्यापासून कार्ला फाट्यापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावर ग्रामस्थांनी ठिय्या देत रास्तारोको आंदोलन केले. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलनकर्त्यांनी या वेळी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले, की आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, प्रथम मंदिर परिसरातील प्रलंबित समस्या सोडवा, स्थानिक व्यावसायिक, रिक्षाचालक आणि अन्य व्यवसायांवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांचा रोजगार हिरावून घेणारा रोप वे प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली.
कायमस्वरूपी पोलिस चौकीची मागणी
देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूककोंडी तसेच वादाचे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे देवस्थान परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करून आवश्यक पोलिस कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली. भाविक व पर्यटकांसाठी शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पुरेशी आणि स्वच्छ शौचालये उपलब्ध करून द्यावीत, देवस्थान परिसरात अनधिकृत वाहतूक तसेच मद्यपान करून मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी आणि वन विभागाच्या जागेतील वाहनतळ ग्रामपंचायतीकडे वर्ग करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.