Pimpri Chinchwad Traffic Police: पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक शाखेत ‘ड्युटी नको रे बाबा’; ८० पोलिसांची प्रतिनियुक्ती, अनेक कर्मचारी गैरहजर

कोंडी वाढली, मनुष्यबळ अपुरे; रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर ‘विना वेतन’ची कारवाई, उद्योगांनाही वाहतूक कोंडीचा फटका
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाहतूक शाखेत काम करण्यास मात्र अनेक पोलिस कर्मचारी अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन सुमारे ८० पोलिसांची वाहतूक विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यांपैकी अनेक कर्मचारी हजरच झाले नाहीत. वरिष्ठांच्या आदेशानंतरही रुजू न झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना एक दिवस 'विना वेतन' करण्याची शिक्षा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Traffic Police
Dowry Death Case: हुंडाबळी, महिला अत्याचार थांबणार कधी?; दोषींना कठोर शिक्षा द्या: सुषमा अंधारे

शहरातील वाहनसंख्या आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाकड, ताथवडे, हिंजवडी, निगडी, भोसरी, नाशिक फाटा, मोशी, चिखली तसेच चाकणकडे जाणाऱ्या मार्गांवर गर्दीच्या वेळेत वाहनांच्या रांगा लागत आहेत. मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत मार्गांवरही दबाव वाढल्याने एका ठिकाणी झालेल्या छोट्याशा अडथळ्याचा परिणाम काही वेळात आसपासच्या अनेक चौकांवर दिसून येतो. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन हा आता केवळ काही प्रमुख चौकांपुरता मर्यादित विषय राहिला नसल्याचे दिसून येते.

Traffic Police
Old Sangvi Water Crisis: नव्या सांगवीत व्हर्टिकल शाफ्ट, मग जुन्या सांगवीला का डावलता?; पाण्यासाठी नागरिकांचा संतप्त सवाल

पोलिसांना पर्याय नाही

सीसीटीव्ही, ई-चलन, सिग्नल यंत्रणा आणि अन्य तंत्रज्ञानामुळे नियमभंगावर कारवाई करणे सुलभ झाले आहे. मात्र, अचानक कोंडी झालेल्या चौकात वाहने मार्गी लावणे, अपघातानंतर रस्ता मोकळा करणे, अवजड वाहनांमुळे निर्माण झालेली अडचण दूर करणे अथवा आपत्कालीन वाहनाला मार्ग उपलब्ध करून देणे यासाठी प्रत्यक्ष पोलिसाची उपस्थिती आवश्यक असते. त्यामुळे वाढत्या शहरासाठी केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि सिग्नल उभारून प्रश्न सुटणार नाही. वाहतूक शाखेला आवश्यक मनुष्यबळ मिळणे आणि त्याचा प्रभावी वापर होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Traffic Police
Pimpri Chinchwad General Body Meeting: पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबरची सभा वादात; ‘सात दिवसांची नोटीस’ की नियमभंग?

वाहतूक शाखेतील सुविधांकडेही लक्ष हवे

या प्रकारानंतर वाहतूक पोलिसांच्या कामाच्या परिस्थितीचाही मुद्दा पुढे आला आहे. अत्यंत व्यस्त चौकांवरील ड्युटीचे योग्य रोटेशन, ठराविक कालावधीनंतर विश्रांती, आवश्यक सुरक्षा साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास कर्मचाऱ्यांचा वाहतूक शाखेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. शिस्तीबरोबरच कामाचे वातावरण सुधारणेही तितकेच आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

म्हणून रस्त्यावरची ड्युटी नको...!

वाहतूक शाखेतील ड्युटी तुलनेने अधिक कष्टाची असल्याची भावना पोलिस दलात आहे. ऊन, पाऊस, धूळ आणि वाहनांचा धूर सहन करीत चौकात दीर्घकाळ उभे राहावे लागते. अपघात, बंद पडलेली वाहने, अचानक निर्माण झालेली कोंडी, व्हीआयपी दौरे, मोर्चे, मिरवणुका आणि सणांच्या काळातील बंदोबस्तामुळे कामाच्या वेळेचे गणितही अनेकदा बिघडते. त्यात नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना वादाचे प्रसंग उद्भवतात. या सगळ्यामुळे पोलिस ठाणे अथवा अन्य शाखेतील नियुक्तीच्या तुलनेत वाहतूक विभागात जाण्यास कर्मचारी फारसे उत्सुक नसल्याचे सांगितले जाते.

कोंडीचा फटका थेट उद्योगांना

शहर आणि लगतच्या औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीची समस्या किती गंभीर झाली आहे, याची प्रचिती नुकतीच चाकणमध्ये आली. रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग आणि तासन्‌तास होणाऱ्या कोंडीमुळे काही उद्योगांनी चाकणमधून स्थलांतराचा इशारा दिला होता. विषय थेट राज्य सरकारपर्यंत गेल्यानंतर प्रशासनाला तातडीने उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. त्यानंतर उद्योगांनी स्थलांतराचा विचार तूर्त मागे घेतला असला, तरी वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नामुळे उद्योगांना असा इशारा द्यावा लागणे ही बाब औद्योगिक विकासाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे.

Traffic Police
Pimpri Chinchwad MIDC Facilities: पिंपरी-चिंचवड एमआयडीसीची जबाबदारी महापालिकेकडून काढा; उद्योजकांची एमआयडीसीकडे सोपविण्याची मागणी

उद्योगनगरीत हवी सक्षम वाहतूक व्यवस्था

चाकणच्या घटनाक्रमामुळे वाहतूक कोंडी हा केवळ गैरसोयीचा प्रश्न राहिला नसल्याचे अधोरेखित झाले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत कंपनीत पोहोचता येत नाही, कच्च्या मालाची आणि तयार मालाची वाहतूक रखडते. इंधन आणि वाहतूक खर्च वाढतो. परिणामी कोंडीचा थेट परिणाम उत्पादन आणि उद्योगांच्या निर्णयांवर होतो. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत हिंजवडी आयटी पार्क, भोसरी एमआयडीसी तसेच तळेगाव-चाकण औद्योगिक पट्टा असल्याने परिसरासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे.

वाढत्या कोंडीची ४७७ जणांवर जबाबदारी

पिंपरी-चिंचवडची हद्द, लोकसंख्या, वाहनसंख्या, गृहप्रकल्प आणि औद्योगिक विस्तार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार वाहतूक व्यवस्थेवरील जबाबदारीही वाढत आहे. शहरातील कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकनिहाय नियोजनासोबत प्रत्यक्ष रस्त्यावर सक्षम यंत्रणा असणे महत्त्वाचे आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेत सध्या एकूण ४७७ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. यामध्ये ३२२ पुरुष आणि १५५ महिला आहेत. पदनिहाय पाहिल्यास एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, १६ पोलिस निरीक्षक, सहा सहायक पोलिस निरीक्षक, १० पोलिस उपनिरीक्षक आणि २९ श्रेणी पोलिस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. याशिवाय ४० सहायक पोलिस फौजदार, १९४ पोलिस हवालदार, पाच पोलिस नाईक आणि १७३ पोलिस शिपाई आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यासाठी सध्या मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याकडून तात्पुरते मनुष्यबळ घेण्यात आले आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

logo
Pudhari News
pudhari.news