

दापोडी: एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमण मोहीम तीव्रतेने राबवली जात असली तरी दुसरीकडे मात्र दापोडी आणि परिसरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. दापोडी गावठाणात तर अक्षरशः अतिक्रमण बोकाळले आहे. परंतु महापालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने दापोडी परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त आहेत.
त्यामुळे दापोडी परिसरातील रस्ते कधी घेणार मोकळा श्वास असे विचारण्याची वेळ दापोडीकरांवर आली आहे. दापोडीतील आबा काटेनगर परिसर, तथागत गौतम बुद्ध उद्यान परिसर, स्मशानभूमी रस्ता, वि. भा. पाटील पुलाजवळील रस्ता, रेल्वे फाटकाजवळील परिसर या मुख्य मार्गांवर सध्या बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांनी आणि अतिक्रमणांनी रस्त्यांचा श्वास कोंडला आहे. अशा प्रवृत्तींवर प्रशासन लगाम घालणार का, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वाहतूक कोंडीत पडतेय भर
दापोडीतील रस्त्यांवर फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी सकाळी तसेच सायंकाळी या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागत आहे. प्रशस्त रस्ते असूनही अतिक्रमणामुळे या भागाचे विद्रूपीकरण होत आहे. मुख्य रस्त्यांवरच होणाऱ्या बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे लहान मोठे अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे. जोपर्यंत अशा बेशिस्त प्रवृत्तींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत या भागाचे बकालीकरण थांबणार नाही, अशी संतप्त भावना नागरिकांमधून उमटत आहे.
येथे होतेय अनधिकृत पार्किंग
पिंपळे गुरवकडून येणाऱ्या पीएमपीएमएलच्या बस आबा काटेनगर परिसर मार्गावरून पुण्याकडे जातात. तसेच मुंबई-पुणे महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून देखील या मार्गाचा वापर अनेक मोठ्या गाड्या, खासगी आणि अवजड वाहनांकडून केला जातो. त्यामुळे या रस्त्यांवर दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते.
या उपाययोजनांची गरज
समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मुख्य चौकांमध्ये आणि वर्दळीच्या रस्त्यांवर 'नो-पार्किंग' क्षेत्र घोषित करणे.
नियमितपणे टोईंगची कारवाई करणे आणि पालिकेने मोकळ्या जागी अधिकृत वाहनतळ उभारून रस्त्यावरील भार कमी करणे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे सकाळी व संध्याकाळी गस्त घालून रस्ते मोकळे करणे.
नियम मोडणाऱ्यांचे कायमस्वरूपी जप्तीची कारवाई करणे.
सदर तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. रस्त्यावर अडथळा ठरणारी वाहने तातडीने हटवून संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. हे अतिक्रमण विभागाची कारवाई सातत्याने सुरू राहील. रस्त्यावर कायमस्वरुपी उभी असणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.
विश्वनाथ चव्हाण, वाहतूक पोलिस निरीक्षक, दापोडी.
रस्ता मोठा असला तरी दोन्ही बाजूने उभी असणारी वाहने आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची व व्यावसायिकांची झालेली अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे रहदारीच्या वेळी येथे कायम चौकात वाहतूक कोंडी होते. यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी.
मनोज गदम, स्थानिक रहिवासी, दापोडी.