

पिंपळे गुरव: कासारवाडी परिसरातील खराब रस्ते, भुयारी मार्गातून होणारी वाहनांची मोठी वर्दळ आणि त्यातच नादुरुस्त होणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रविवारी कासारवाडी बीआरटीएस थांब्याजवळ पीएमपीएमएलची बस रस्त्यातच नादुरुस्त होऊन बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. बसच्या मागे आलेल्या इतर बसेसही एकामागोमाग एक उभ्या राहिल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.
बीआरटीएस थांब्याजवळच बस बंद पडल्याने त्यातील प्रवाशांना खाली उतरावे लागले. रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने प्रवाशांनी सुरक्षिततेसाठी समोरील पदपथाचा आधार घेतला. त्यामुळे पदपथावरही प्रवाशांची गर्दी झाली होती. बंद पडलेली बस हटविण्यास विलंब झाल्याने इतर पीएमपीएमएल बसेसनाही पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला.
कासारवाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था आधीच खराब आहे. कासारवाडी भुयारी मार्गातून जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या असल्याने या भागात नियमितपणे वाहतुकीचा ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत बीआरटीएस थांब्याजवळच पीएमपीएमएल बस बंद पडल्याने कोंडीत आणखी भर पडली.
बीआरटीएस थांबा हा प्रवाशांची मोठी वर्दळ असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी बस नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उतरावे लागणे ही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बसच्या बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. कासारवाडीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच बीआरटीएस थांब्याजवळ बस नादुरुस्त झाल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पीएमपीएमएल आणि वाहतूक विभागाने प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी नागरिक वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे.
कासारवाडीकरांची कोंडीतून कधी होणार सुटका?
कासारवाडी येथे मागील काही दिवसांपासून रस्ते खराब झाले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे या भागातील वाहतूक मंदावली आहे. त्यात नादुरुस्त बसमुळे कासारवाडीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अजून किती दिवस या समस्यांना सामोरे जावे लागणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.