Pimpri Chinchwad Drought Migrant Workers Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Drought Migrant Workers : दुष्काळामुळे मजुरांचे शहराकडे स्थलांतर; पिंपरी-चिंचवडमध्ये कामासाठी पहाटेपासून गर्दी

रोजंदारी अनिश्चित, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर; मायक्रो फायनान्स कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याची मजुरांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बाळू महाजन

चिंचवड: वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगरसह शहरातील अन्य भागांत दुष्काळग्रस्‍त जिल्ह्यांतून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर तरुण, कामगार शहरात येत आहेत. गावाकडे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दाखल होत आहे. चिंचवड, बिजलीनगर आदी भागांतील मजूर अड्‍ड्यांवर पहाटेपासूनच कामगारांची गर्दी पाहायला मिळत आहे.

प्रशांत महासागरातील एल निनोच्या वाढता प्रभाव आणि दक्षिण आशियातील तीव्र उष्णतेच्या हंगामाची शक्यता यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान उभे राहिले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत-बांगलादेश- नेपाळ -आणि भूतान या चार देशांनी एकत्रित पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती शेतातील घटलेला रोजगार आणि वाढती बेरोजगारी यामुळे रोजगारांच्या शोधात शहराकडे येणाऱ्या कष्टकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाल्हेकरवाडी -चिंचवड- बिजलीनगर परिसरातील विविध मजूर अड्ड्यांवर पहाटेपासून कामाच्या अशाने जमलेल्या मजुरांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकाच्या हाताला काम मिळेलच याची कोणतीही शास्वती नसल्याने अनेकांना संध्याकाळी रिकाम्या हाताने घराकडे परतावे लागते.

या भागांतून आलेत कामगार

बिजलीनगर मजूर अड्ड्यावर बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कर्नाटक, लातूर, परभणी, नांदेड, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले कामगार मोठ्या संख्येने दिसतात. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आलेले अकुशल कामगारही येथे रोजगाराच्या शोधात दाखल झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातील खोदाई, भराई, माती, वाळू व विटा उचलणे, मालवाहतूक, अवजड साहित्य हलवणे, रंग कामासाठी मदत करणे, प्लंबिंगच्या कामात कारागिरांना हातभार लावणे, अशा मिळेल त्या अंगमेहनतीच्या कामातून कष्टकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहेत.

उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न

दररोज मिळणाऱ्या मजुरीवर घरखर्च भागवणाऱ्या कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे घरातील किराणा, मुलांची शिक्षण, औषधोपचार, वीजबिल आणि इतर दैनंदिन खर्च भागवण्याची कसरत सुरू असताना दुसरीकडे बचत गटाच्या माध्यमातून किंवा समूहाच्या हमीवर मायक्रो फायनान्स संस्थांकडून साधारणता ५० हजारांपासून तर ९० हजारापर्यंत कर्ज घेतले जाते. काही महिलांनी एकाच वेळी दोन ते तीन बचत गटांमधून कर्ज घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मजुरी नेहमी मिळत असताना आठवड्याला, पंधरवड्याला किंवा महिन्याला कर्जाचा हप्ता भरणे महिलांना शक्य होत होते. मात्र, सध्या मजुरीची कामेच कमी झाल्याने बिकट परिस्‍थिती आली आहे. हातात पैसा येत नसल्याने हप्त्याची तारीख जवळ येत असल्याने मजुरांमध्ये चिंता वाढली आहे. महिलांना कर्जाचा हप्ता थकीत राहिल्यास पुढील कर्ज मिळण्यास अडचण येण्याची तसेच अतिरिक्त शुल्क किंवा दंडाचा आर्थिक भार पडण्याची चिंता आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षा

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मायक्रो फायनान्स कर्जाच्या वसुलीला काही कालावधीसाठी स्थगिती द्यावी तशी रोजगार नसलेल्या काळात हप्ते थकीत झाल्यास दंड किंवा अतिरिक्त शुल्क आकारू नये, अशी मागणीदेखील मजूर बोरमा कांबळे व महिला करत आहेत.

सुशिक्षित तरुणांची संख्या लक्षणीय

मजूर अड्ड्यांवर तरुणांची संख्याही लक्षणी आहे. गावाकडे रोजगारांच्या संधी नसल्याने अनेक सुशिक्षित आणि अल्पशिक्षित तरुणांना शहराचा आधार घ्यावा लागत आहे. काही जण शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहींना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी कोणत्याही श्रमाचे काम स्वीकारावे लागत आहे. कामानुसार साधारण ७०० ते १२०० रुपये मजुरी मिळते. ही मजुरी दररोज मिळेलच याची कोणतीही हमी नसते. त्यामुळे महिन्याचे उत्पन्न अनिश्चित राहते आणि कुटुंबाचा आर्थिकगाडा चालवताना मजुरांना तारेवरची कसरत करावी लागते.

शहरातील मजूर अड्‌ड्यांवर दिवसेंदिवस कामगारांची संख्या वाढत आहे. गावाकडून रोजगाराच्या संधी कमी झाल्याने शहरात सुरुवातीला दुसरे काम मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र, सध्या मिळेल ते काम ठेकेदारी पद्धतीने करूनच उदरनिर्वाह करावा लागत आहे.
पांडुरंग कांबळे, ठेकेदार, बिजलीनगर.
सध्या महागाईने बेजार झालो आहोत. दररोज पहाटे कामाच्या आशेने आम्ही मजूर अड्ड्यावर येतो. काम मिळाले तर दिवसभर राबतो आणि त्या मजुरीतून घरखर्च भागवतो. पण काही दिवस कामच मिळत नाही. अशा वेळी रिकाम्या हाताने घरी परतण्याशिवाय पर्याय राहत नाही.
अडिवाप्पा कुचवाड, कामगार (मूळगाव सोलापूर).
महागाई वाढल्याने घरचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पतीसोबत कामासाठी येते. मिळेल ते काम करण्याची तयारी असते, पण रोज काम मिळत नाही. काम मिळालेला दिवसच आमच्यासाठी व परिवारासाठी दिलासा देणारा ठरतो. पूर्वीसारखा गावाकडे रोजगार उरलेला नाही. वर्षभर काम मिळत नसल्याने कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला शहरात यावे लागते. येथेही रोज काम मिळत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, ही चिंता आहे.
संगीता लमाणी, मजूर (मूळगाव हैदराबाद).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT