

पिंपरी: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या नात्यांचा गोडवा. अनेकांचे नातेवाईक शिक्षण, नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात राहतात. त्यामुळे त्यांना दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता येत नाही. त्या वेळी आपल्या प्रियजनांना फराळाचे पदार्थ कसे पाठवता येतील, असा प्रश्न सर्वांना सतावतो. मात्र, आता या अडचणी दूर करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवाळी फराळाची गोड, तिखट अन् खुसखुशीत फराळाची भेट परदेशात पाठविणे अधिक सोपे होणार आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना, मित्रपरिवाला आणि आतेष्टांना घरगुती फराळ पाठविण्यासाठी पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील पोस्ट ऑफिसमधून पार्सल बुक करता येणार ओह. या उपक्रमामुळे हजारो किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या भारतीयांपर्यंत मायदेशातील सणाचा आनंद, घरच्या चवीची आठवण कुटुंबीयांच्या प्रेमाची भेट पोहोचविण्यासाचा मार्ग सुकर होणार आहे.
पॅकेजिंग आणि पार्सल सुविधा एकाच ठिकाणी
या विशेष सुविधेअंतर्गत दिवाळी फराळाच्या पार्सलसाठी आवश्यक असलेले विशेष बॉक्स आणि पॅकिंग साहित्य नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पॅकजिंग आणि पार्सल बुकिंग या दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे पॅकिंगचे साहित्य शोधणे, पार्सल व्यवस्थित तयार करणे आणि त्यानतंर बुकिंगसाठी स्वतंत्र्य व्यवस्था करणे, या प्रकियेत नागरिकांचा वेळ वाचणार आहे. चिंचवड येथील पूर्व मुख्य टपाल कार्यालयात स्वतंत्र पॅकेजिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना फराळाचे पार्सल योग्य प्रकारे पॅक करून परदेशात पाठविणे सोयिस्कर होईल. सणासुदीच्या काळात परदेशात फराळ पाठविणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
नियम काय
पार्सल बुक करण्यापूर्वी संबंधित देशातील खाद्यपदार्थ आयातीचे नियम, पाठविण्यास परवानगी असलेले पदार्थ पॅकिंगविषयक अटी आणि टपाल विभागाने नियम यांची माहिती जवळच्या पोस्ट ऑफिसमधून आवश्यक घेणे आवश्यक आहे. नियमानुसार पॅकिंग केल्यास आपल्या माणसापर्यंत दिवाळी फराळ पोहचविणे अधिक सुलभ होणार आहे.
परदेशातील आपल्या आप्तजणांना व स्वकीयांना दिवाळी फराळ पार्सल पाठवण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. कमी दरामध्ये व कमीत कमी वेळेत आपल्या प्रियजनांना पार्सल पाठविण्यासाठी सर्वसामान्य जनतेने भारतीय टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट व नोंदणीकृत पार्सल सेवेचा लाभ घ्यावा.
समीर महाजन, अधीक्षक डाकघर