DJ Free Ganeshotsav Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehugaon Ganeshotsav DJ Restrictions: ‘माझा आनंद, दुसऱ्याचा त्रास नको!’; देहूगावकरांचा डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन; डीजे आणि मद्यविक्रीवरील निर्बंधांचे नागरिकांकडून स्वागत

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: डीजेच्या प्रचंड आवाजाचा त्रास वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले तसेच ध्वनीसंवेदनशील नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करताना माझा आनंद दुसऱ्याच्या त्रासाचे कारण ठरू नये, एवढे सामाजिक भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

आपले सण-उत्सव हे आनंद, उत्साह आणि संस्कृती जपण्यासाठी आहेत. त्यामुळे कर्णकर्कश डीजेऐवजी सनई-चौघडे, ढोल-ताशे, लेझीम आणि अन्य पारंपरिक वाद्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास उत्सवाचा आनंदही वाढेल आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतनही होईल, अशी प्रतिक्रिया देहूगावातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी दिल्या.

सर्वच धर्मांच्या सण-उत्सवांमध्ये डीजे व कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापरावर समान पद्धतीने निर्बंध असावेत. आपला देश धर्मनिरपेक्ष असून, समानता आणि सर्वांना समान संधी या तत्त्वांवर आधारित आहे. त्यामुळे कोणत्याही एका धर्माच्या किंवा समाजाच्या कार्यक्रमापुरते निर्बंध न राहता, सर्वच धर्मांच्या सण-उत्सवांसाठी ध्वनिप्रदूषणाबाबत समान नियम असणे आवश्यक आहे.               
विद्या कांबळे, शिक्षिका, देहूगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने डीजेवर घातलेले निर्बंध तसेच मद्यविक्रीची दुकाने (वाइन शॉप्स) बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह व स्तुत्य आहे. उत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण टाळून आपली मूळ परंपरा जपणे ही काळाची गरज आहे.
वैभवमहाराज मोरे, विश्वस्त, देहू संस्थानचे
गणेशोत्सव म्हणजे केवळ मोठा आवाज, डीजे आणि धांगडधिंगा नव्हे; तर तो भक्ती, श्रद्धा, संस्कृती आणि समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. त्यामुळे डीजेवरील निर्बंध तसेच गणेशोत्सवाच्या काळातील मद्यविक्रीवरील बंदी याकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे ध्वनीच्या पातळीवर मर्यादा असणे योग्यच असून, जनतेनेही या संकल्पनेचा आदर केला पाहिजे.
मेहमूदा शेख, नागरिक, देहूगाव
डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि अमर्याद ध्वनीप्रदूषणाला निश्चितच आळा बसला पाहिजे. मात्र, उत्सवाचा आनंद आणि वातावरण कायम ठेवण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या ध्वनिमर्यादेत, कमी बेसच्या आवाजात स्पीकरचा वापर करण्यास परवानगी असावी. दारू पिऊन धिंगाणा घालणे, कर्णकर्कश आवाज करणे, इतरांना त्रास देणे किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे याला निश्चितच आळा बसला पाहिजे. त्यासाठी आवश्यक नियम आणि निर्बंध असणे गरजेचे आहे.
रमेश जाधव, जिल्हा सल्लागार, शिवसेना (उद्धव ठाकरे)
ध्वनीवर्धक आणि डीजेच्या अतिरिक्त आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे डीजेवरील निर्बंध हे उत्सवातील कार्यकर्त्यांवरील अन्याय करणारे नसून, नागरिकांच्या आरोग्याचा आणि सामाजिक हिताचा विचार करून घातलेली आवश्यक बंधने आहेत. त्याचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे.
ॲड. कैलास विठ्ठल पानसरे, सदस्य, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकदा घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच महिलांना त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे मद्यविक्रीमुळे काही ठिकाणी गैरप्रकार आणि अशांततेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सवाचे हे दहा दिवस डीजे आणि वाईन शॉप बंद ठेवण्यात आले, तर कुटुंबांना शांततेत आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करता येईल.
ज्योती वैरागर, माजी उपाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT