

पिंपरी: चाकण-आळंदीच्या औद्योगिक पट्ट्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. आता त्याच कोंडीला कायमस्वरूपी उत्तर देण्यासाठी रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू झाली आहेत. मात्र, काम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान पीएमआरडीएसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे सहा प्रमुख मार्गांवर टप्प्याटप्प्याने एकेरी वाहतूक लागू करण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएने वाहतूक पोलिसांकडे दिला आहे. प्रस्तावित नियोजनानुसार १० सप्टेंबरपासून वाहतूक बदल अपेक्षित होता; मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने रस्ते विकासकामांना अपेक्षित वेग मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
चाकण, मोई, निघोजे, कुरुळी, खालुंब्रे, आळंदी आणि एमआयडीसी फेज-३ या परिसरातील महत्त्वाच्या जोडरस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे. ५.५० ते १० मीटरपर्यंत रस्त्यांची रुंदी वाढविण्याचे नियोजन असून, काही रस्त्यांची कामे नोव्हेंबर, तर काहींची डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहिल्यास कोंडी वाढण्याची शक्यता असल्याने पीएमआरडीएने पर्यायी मार्गांचे नियोजनही केले आहे.
'वन-वे'चा निर्णय महत्त्वाचा
रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू असताना वाहतुकीचे नियोजन झाले नाही, तर विकासकामांमुळेच कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएमआरडीएने सुचविलेल्या एकेरी वाहतुकीच्या नियोजनाबाबत वाहतूक पोलिसांकडून निर्णय होणे महत्त्वाचे ठरणार आहे. औद्योगिक वाहतूक, अवजड वाहने आणि स्थानिक वाहतूक यांचा मोठा ताण असलेल्या या पट्ट्यात पर्यायी मार्गांची अंमलबजावणी झाल्यास कामाच्या कालावधीत वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
या मार्गावर वन-वेची गरज नाही
आळंदी-मरकळ रस्ता ते चऱ्होलीमार्गे आळंदी रस्ता या दोन किलोमीटरच्या मार्गाची रुंदी १० मीटर असल्याने येथे सध्या एकेरी वाहतूक लागू करण्याची आवश्यकता नसल्याचे पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
काम पूर्ण झाल्यावर कोंडीवर 'ब्रेक'?
चाकण-आळंदी औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या, कामगारांची वाहतूक आणि मालवाहू वाहनांची ये-जा असते. त्यामुळे अरुंद रस्ते आणि वाढता वाहनभार यांचे समीकरण कोंडीला कारणीभूत ठरत आहे. रस्ते रुंदीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार असली, तरी कामाच्या काळातील वाहतूक व्यवस्थापन हा तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे.
सहा रस्त्यांवर विकासकामे सुरू
चिखली-मोई : १,३०० मीटर रस्त्याचे काम. १० सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर कालावधी. चिखली-मोईऐवजी मोशीमार्गे पुणे-नाशिक रस्ता, चिंबळी फाटा, कुरुळी, निघोजे मार्गे मोई.
कुरुळी फाटा-निघोजे : १,९०० मीटर रस्त्याचे काम. १० सप्टेंबर ते ३० डिसेंबर. जय हनुमान चौक, एमआयडीसी फेज-३, वोक्सवॅगन रस्ता मार्गे पुणे-नाशिक रस्त्याचा पर्याय.
खालुंब्रे-हुंदाई कंपनी : १,३०० मीटर रस्ता. १० सप्टेंबर ते १० डिसेंबर. सावरदरी रस्ता, एचपी चौक मार्गे तळेगाव-चाकण रस्त्याकडे जाण्याचा पर्याय.
निघोजे-एमआयडीसी फेज-३ मार्गालाही पर्याय : निघोजे गावठाण ते एमआयडीसी फेज-३ या रस्त्याच्या कामाच्या काळात निघोजे गावठाण → जय हनुमान चौक → एमआयडीसी फेज-३ हा पर्यायी मार्ग वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चाकण फाटा-आळंदी मार्गावर मोठे काम
८ किलोमीटरचा चाकण फाटा-आळंदी रस्ता या सहा कामांपैकी सर्वांत मोठा टप्पा आहे. १० सप्टेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान काम सुरू राहणार आहे. या काळात आळंदी बाह्यवळण रस्ता → चिंबळी → पुणे-नाशिक रस्ता हा पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्तावित मार्गांची वाहतुकीच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने एकेरी वाहतूक लागू करताना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल.
नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग चाकण
चाकण व आळंदी औद्योगिक परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सहा महत्त्वाच्या रस्त्यांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. कामाच्या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये आणि कामाला गती मिळावी, यासाठी आवश्यक त्या मार्गांवर एकेरी वाहतुकीचे नियोजन सुचविण्यात आले आहे. वाहनचालकांनी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे.
शिवकुमार कुपल, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए, पुणे.