Indrayani River Pollution Pudhari
पिंपरी चिंचवड

Indrayani River Pollution: इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत; देहूगावात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न

वारकरी भाविकांच्या आरोग्याचा धोका वाढला; नदीत दुर्गंधी आणि दूषित पाण्याची समस्या तीव्र

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र देहूगाव येथे लाखो वारकरी भाविकांची गर्दी उसळलेली असताना इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसून आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, वारकरी भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नदीपात्रातील ही स्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. काही मास्यांमध्ये किडे पडल्याचेही निदर्शनास आले असून, यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे.

या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पाठबंधारे विभाग, देहू नगरपंचायत, संबंधित ठेकेदार तसेच बीव्हीएफ जावळे कन्स्ट्रक्शन यांच्यावर बोट दाखवले जात आहे. विशेषतः भामा-आसखेड धरणाच्या पाण्याच्या पाइपलाइनसाठी नदीचे पाणी अडविण्यात आल्याचा आरोप होत आहे. नगरपंचायतीने पाणी सोडण्याची मागणी करूनही पाठबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराबाबत देहू देवस्थान मात्र मूग गिळून गप्प बसले असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

दरम्यान, नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने काही सोसायट्यांमधील मैलामिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी हे दूषित पाणी मिसळते, त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे आढळले आहे. माळीनगर पाणवठा ते मुख्य मंदिरामागील घाट या पट्ट्यात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे.

'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा पुढाकार

याच पार्श्वभूमीवर 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत नदीपात्रातील मृत मासे बाहेर काढून त्यांचे दहन केले. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घाट परिसरात दुर्गंधी

नदीत वाढलेली जलपर्णी, दुर्गंधी, दूषित पाणी आणि मृत मास्यांचे प्रमाण लक्षात घेता वारकरी भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी नागरिक व वारकरी भाविकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी होत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT