Nigdi Chakan Metro: निगडी–चाकण मेट्रो डीपीआर रखडला; मंजुरीअभावी प्रकल्प लांबणीवर

47 किमी मार्गाचा सुधारित आराखडा महापालिकेत अडकला; खर्चात 2,500 कोटींची वाढ
Pune Metro
Pune MetroPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील निगडी ते चाकण या दुसर्‍या मेट्रो मार्गाचा निर्णय प्रलंबित आहे. महामेट्रोने त्या मार्गाचा सुधारित डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) महापालिकेस फेब्रुवारी महिन्यात सादर केला आहे. मात्र, तो डीपीआर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात न आल्याने साडेतीन महिन्यांपासून धूळ खात पडला आहे.

Pune Metro
Talegaon Temple Theft: तळेगावात देवीचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला; एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

निगडी ते चाकण या वाकड मार्गे मेट्रोच्या मार्गाचा 47.215 किलोमीटर अंतराच्या सुधारित डीपीआर महामेट्रोने महापालिका आयुक्तांकडे 26 फेब्रुवारी 2026 ला सादर केला आहे. त्यासाठी तब्बल 12 हजार 937 कोटी 23 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. डीपीआर सादर करून साडेतीन महिने उलटले तरी, सुधारित डीपीआर महापालिकेच्या सभागृहासमोर सादर केला गेला नाही आणि त्याला सभागृहाची अंतिम मान्यता मिळालेली नाही. दुसरीकडे, महापालिकेचे पदाधिकारी व गटनेते तसेच, लोकप्रतिनिधी हे सुधारित डीपीआरचे आमच्या समोर स्वतंत्रपणे सादरीकरण करा. आमच्या कार्यालयात येऊन नवीन मार्ग दाखवा, अशी मागणी महामेट्रो व्यवस्थापन तसेच, महापालिकेकडे करत आहेत. कोणाकोणासमोर सादरीकरण करायचे, या विचारात प्रशासनाने डीपीआरचा विषयच बाजूला सारला असल्याचे दिसून येत आहे.

Pune Metro
School Stationery Shopping: शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग; बाजारपेठ गजबजली

डीपीआर सादर करण्यास आयुक्तांकडून चालढकल

महामेट्रो व्यवस्थापनाने निगडी ते चाकण मार्गाचा सुधारित डीपीआर महापालिका आयुक्तांना फेब्रुवारी 2026 ला सादर केला आहे. तो डीपीआर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी तात्काळ सादर करणे अपेक्षित आहे. सभागृहात प्रत्येक नगरसेवकांना डीपीआरसंदर्भात एकाच वेळी माहिती मिळू शकणार आहे. त्यानंतर चर्चा होऊन, सर्व सहमतीने डीपीआरला तात्काळ मंजुरी मिळू शकते. सभागृहाच्या मंजुरीशिवास डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीला पाठवता येत नाही. त्यानंतर केंद्राची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. कामाचा कालावधी 5 वर्षे आहे. मात्र, आयुक्त हे नवीन मेट्रो मार्गासाठी उदासीन असल्याचे त्यांच्या कृतीवरून स्पष्ट होत आहे.

मेट्रो मार्गाच्या वल्गणा, प्रत्यक्षात मंजुरीसाठी उदासीनता

शहरातील लोकप्रतिनिधी तसेच, महापालिका पदाधिकार्‍यांकडून पिंपरी-चिंचवड शहरात नवीन मेट्रो मार्ग होणार असे सातत्याने सांगितले जात आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावर मोठे मोठे दावे केले जात आहे. त्या मार्गामुळे शहराचा विकास होणार, हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक पट्टा मेट्रोने जोडला जाणार असे दावे केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात सुधारित डीपीआर मंजुरीसाठी पुढे येऊन त्याला गती देण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे. त्यातून त्याची दुप्पटी भूमिका स्पष्ट होत आहे. त्यात नाहक वेळ वाया जाऊन नवीन मार्गास विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रकल्पाचा खर्च आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Pune Metro
Bhushi Dam Safety Issue: भुशी धरण परिसरात सुरक्षा आणि रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

असा आहे 47.295 किमी लांबीचा नवीन मार्ग

हा नवा मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्प चौक येथून सुरू होणार आहे. तेथून निगडीतील ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक असा वाकडपर्यंत जाणार आहे. तेथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गावरील वाकड मेट्रो स्टेशनला मेट्रो बदलता येणार आहे. येथून विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर, गवळीमाता चौक, सेन्चुरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर क्रमांक 1, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडीवरून चाकणपर्यंत मेट्रो जाणार आहे. हा एकूण 47.295 किलोमीटर अंतराचा मार्ग आहे.

नवीन डीपीआरमुळे खर्च अडीच हजार कोटीने वाढला

निगडी ते चाकण मेट्रो प्रकल्पास 12 हजार 937 कोटी 23 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मार्ग बदलल्याने खर्च तब्बल 2 हजार 553 कोटी 34 लाख रुपयाने वाढला आहे. पूर्वी तो खर्च 10 हजार 383 कोटी 89 लाख रुपये इतका होता. पूर्वीचे अंतर 42.262 किलोमीटर इतके होते. सुधारित डीपीआरमध्ये ते अंतर 5 किलोमीटरने वाढून 47.295 किलोमीटर इतके आहे. पूर्वी केवळ 31 मेट्रो स्टेशन होते. नवीन डीपीआरमध्ये तीन स्टेशनची भर पडून या मार्गावर एकूण 34 मेट्रो स्टेशन असणार आहेत.

नव्याने भोसरीतील तीन स्टेशनचा समावेश

सुधारित डीपीआरमध्ये नव्याने लांडेवाडी, भोसरी गाव आणि भोसरी सेक्टर क्रमांक 1 या तीन मेट्रो स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. भोसरी ते चाकण हा 17 किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या डेबल डेकर रचनेचा असणार आहे. त्यासाठी भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे.

Pune Metro
TCS Employee Case: टीसीएस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल

भोसरी डिस्ट्रीक्ट सेंटर येथे मेट्रो डेपो

इंद्रायणीनगर, भोसरी येथील डिस्ट्रीक्ट सेंटर येथे मेट्रोचा डेपो उभारला जाणार आहे. डिस्ट्रीक्ट सेंटरसाठी पीएमआरडीएने एकूण 19.57 हेक्टर जागा आरक्षित केली आहे. या जागेशेजारी 16 हेक्टर जागेत डेपो असणार आहे. डेपोत मेट्रो कोची (डबे) दुरूस्ती व देखभाल तसेच, नियमित स्वच्छता केली जाणार आहे.

सुधारित डीपीआरमधील चित्र

  • पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण स्टेशन : 28

  • चाकण नगरपालिका हद्दीतील एकूण स्टेशन : 6

  • मार्गावरील एकूण स्टेशन : 34

  • मार्गाचे एकूण अंतर : 47.295 किमी

  • मार्ग : उन्नत (एलिव्हेटेड)

  • एकूण खर्च : 12 हजार 937 कोटी 23 लाख रुपये

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी सूचना केल्यानुसार महामेट्रोने निगडी ते चाकण मार्गाचा सुधारित डीपीआर तयार केला आहे. तो सुधारित डीपीआर फेब्रुवारी 2026 ला महापालिकेस सादर केला आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या पदाधिकार्‍यांना महामेट्रोशी चर्चा करायची आहे. मात्र, अद्याप सादरीकरणासाठी महापालिकेकडून कोणतेही सूचना प्राप्त झालेली नाही. सूचना मिळाल्यास महामेट्रोकडून सादरीकरण केले जाईल.

चंद्रशेखर तांबवेकर, संचालक, महामेट्रो

महामेट्रोने सादर केलेला निगडी ते चाकणचा सुधारित डीपीआर आयुक्तांना समजून घ्यायचा आहे. त्यासंदर्भात मेट्रोच्या अधिकार्‍यांसोबत बैठक लावण्यात येणार आहे. त्यानंतर तो सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल.

बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news