Electricity Pudhari
पिंपरी चिंचवड

Chikhli Power Substation: चिखली-मोशी भागाला दिलासा; २२ केव्ही नवीन स्विचिंग सबस्टेशनला मंजुरी

वीज खंडित होण्याच्या समस्येवर तोडगा; आठ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे महावितरणचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

मोशी: चिखली परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याची समस्येत वाढ झाली असून, नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आता चिखलीकरांची यामधून लवकरच सुटका होणार असून, येथील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल महावितरणतर्फे उचलण्यात आले आहे.

'टाउन डीपीआर'अंतर्गत चिखली येथे २२ केव्ही क्षमतेच्या नव्या 'स्विचिंग सबस्टेशन'ला मंजुरी मिळाली असून, यामुळे परिसरातील विजेचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या या प्रकल्पाची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, मुख्य कार्यालय स्तरावर 'कमर्शियल बीड' होणार आहे. या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या संस्थेला पुढील काही दिवसांत 'लेटर ऑफ अवॉर्ड' मिळून कामाची मंजुरी प्राप्त होईल.

या संपूर्ण प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यानंतर सुरू होणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. कारण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सध्या खोदकामाची परवानगी दिली जात नाही. ऑक्टोबर महिन्यापर्यंत महापालिकेची आवश्यक ती खोदकाम व केबल टाकण्याची परवानगी घेण्याचे प्रशासकीय काम पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती दिली जाईल.

आठ महिन्यांत उभारणार सबस्टेशन

संबंधित एजन्सीला हे काम पूर्ण करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली असून, सर्व परवानग्यांसह येत्या ८ महिन्यांत हे सबस्टेशन पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट महावितरणाने ठेवले आहे. सध्या चिखली परिसरातील वीजपुरवठा एकाच मुख्य केबलवर अवलंबून असल्याने यंत्रणेवर ताण येत असून, वीज खंडित होण्याचे प्रमाण या भागात वाढले आहे. हे नवीन स्विचिंग सबस्टेशन उभारल्यानंतर एका केबलऐवजी चार वेगवेगळ्या केबल्स जोडल्या जातील, ज्यामुळे विजेची क्षमता वाढेल आणि भार कमी होईल. परिणामी, परिसरातील वीज खंडित होण्याच्या समस्या सुटेल आणि चिखलीकरांना सुरळीत आणि अखंडित वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

'स्विचिंग सबस्टेशन'ची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला गती येईल. आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर महावितरणकडून नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराला सदर काम ६ महिन्यांच्या अवधीत पूर्ण करणे बंधनकारक असेल
विश्वनाथ लहाने, कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT