चऱ्होली: चऱ्होली येथील भोसले वस्तीवर प्रशासनाकडून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र, डागडुजी केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा रस्ता खड्डेमय बनला आहे. यामुळे महापालिका प्रशासन नागरिकांचा कररुपी पैसा ठेकेदार पोसण्यासाठी खर्च करत आहे की सुविधा देण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भोसले वस्तीवरील मार्ग खड्डेमय बनला होता. याबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या वतीने येथील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु काही दिवसांत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजाविषयी प्रश्न निर्माण केला आहे.
भोसले वस्तीवरूनच पुढे डी. वाय. पाटील कॉलेजकडे जाता येते. त्याचप्रमाणे प्राईड वर्ल्ड सिटी मार्गे एअरपोर्ट आणि लोहगावला जाण्यासाठी हाच जवळचा मार्ग आहे. मात्र याच रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच रस्त्यावर विविध शाळा, स्कूल आहेत.
यामुळे येथे कायमच वाहनांची वर्दळ असते. परंतु खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भोसले वस्तीवर छत्रपती संभाजी महाराज चौकात पाण्याची लाईन लिकेज झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता तयार करता येत नाही. आम्ही पाणीपुरवठा विभागाला तसे कळवले आहे. पाण्याची लाईन दुरुस्त झाल्यानंतर आम्ही रस्त्याचे काम करणार आहोत.अमित चव्हाण, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य महापालिका
चऱ्होली परिसरातील नागरिकांना लोहगाव व पुण्यातील पूर्व भागातील इतर उपनगरे तसेच एअरपोर्टला जाण्यासाठी भोसलेवस्ती, पाठारेमळा मार्गेच जवळचा रस्ता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना सहकार्य करावे.सुरेश पठारे, सामाजिक कार्यकर्ते