Airport Road Potholes Pudhari
पिंपरी चिंचवड

Charholi Airport Road Potholes: चऱ्होली एअरपोर्ट रोडवर मोठे खड्डे; नागरिकांची तक्रार

डागडुजी करूनही खड्डे कायम, रस्त्याच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

चऱ्होली: चऱ्होलीचा मुख्य रस्ता असणाऱ्या एअरपोर्ट रोडवर अक्षरशः मोठे खड्डे पडले आहेत. अनेकवेळा या रस्त्याची डागडुजी करूनदेखील सतत खड्डे पडतात. यामुळे या मार्गाचे काम नेमके चांगले झाले आहे की, निकृष्ट याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करून चांगले काम झाले नसेल तर पुन्हा त्या ठेकेदाराला करायला लावावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुणे-आळंदी पालखी मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकातून चऱ्होली गावातील श्री वाघेश्वर महाराज चौकापर्यंत असणाऱ्या चऱ्होलीचा मुख्य रस्ता म्हणजेच एअरपोर्ट रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. चऱ्होलीची जीवनवाहिनी असणाऱ्या या रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने, हॉस्पिटल्स, बँका, शिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे एअरपोर्ट रोडवर चऱ्होली आणि परिसरातील नागरिकांची कायमच ये-जा असते. त्यामुळे हा रस्ता कायमच वर्दळीचा रस्ता राहिला आहे.

एअरपोर्ट रोडच्या बाजूलाच विविध शिक्षण संस्था असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक यांची कायमच वर्दळ असते. शिक्षण संस्थांच्या स्कूलबसदेखील याच रस्त्याने जातात. पुणे-आळंदी पालखी मार्गावर आणि एअरपोर्ट रोडवर विविध हॉस्पिटल असल्यामुळे ॲम्बुलन्सदेखील याच रस्त्याने धावत असतात. या अशा मोठ्या खड्ड्‌‍यांमुळे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका आहे.

अवजड वाहतूक बंद असल्याने रस्त्याचे काम गरजेचे

सध्या दोन्ही चऱ्होलींना जोडणारा चऱ्होलीचा पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे या रस्त्याने अवजड वाहतूक नाही. एरवी आळंदी तीर्थक्षेत्र असल्यामुळे फुलगाव मरकळ, धानोरे या औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक चऱ्होलीच्या पुलावरून याच रस्त्याने पुणे आळंदी मार्गाला मिळते. पण आता सध्या बेरिंग दुरुस्तीच्या कामासाठी चऱ्होलीचा पूल बंद असल्यामुळे अशावेळी चांगल्या पद्धतीने रस्ता करण्याची संधी आहे.

प्रशासनाने या संधीचा उपयोग करून एअरपोर्ट रोडवरील सर्व खड्डे बुजवावेत आणि रस्ता चांगला करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. दाभाडे सरकार चौकात मागील वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्याची एक बाजू मागील काही महिन्यापासून बंद आहे. या पुलाचे काम लवकरात लकवर पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT