

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतून तब्बल 443 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष 692 उमेदवार आहेत. त्यात प्रमुख पक्षांसह अपक्षांचा भरणा आहे. त्यामुळे कोणी बाजी मारणार हे 16 जानेवारी रोजी मतमोजणीतून स्पष्ट होईल.
निवडणुकीसाठी एकूण 32 प्रभागांतील 128 जागांसाठी तब्बल 1 हजार 135 उमेदवार होते. त्यातील 2 जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. एकूण 443 इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. निवडणूक रणसंग्रामात प्रत्यक्ष 692 उमेदवार राहिले आहेत. ते उमेदवार 128 पैकी 126 जागांसाठी लढणार आहेत. अर्ज माघारी घेण्यामध्ये भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आदी प्रमुख पक्षांच्या बंडखोरांचा समावेश होता. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने त्यानुसार उमेदवारांकडून प्रत्यक्ष रणनिती ठरविण्यात येत आहे. प्रभागातील कोणत्या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करायचे, प्रतिस्पर्ध्यांचे मतदार कसे काबीज करायचे, याची मोर्चेबांधणी केली जात आहे.
बंडखोरांना थंड करण्यास भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसला यश
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतून तब्बल 443 जणांनी माघार घेतली आहे. त्यात भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग््रेास आदी प्रमुख पक्षांचे बंडखोर उमेदवार आहेत. मोठ्या प्रमाणात बंडखोरी थंड करण्यात यश मिळाल्याने त्या-त्या पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार (दि. 2) दुपारी तीनपर्यंतची वेळ होती. अखेरच्या दिवशी पक्षाच्या बंडखोरांचे उमेदवारी अर्ज घेण्यात प्रमुख पक्षांना यश आले आहे. तसेच, अनेक अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तब्बल 443 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकाराचे आमिष, प्रलोभन आणि आश्वासने देण्यात आल्याचे समजते.
प्रभागनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या
प्रभाग क्रमांक 10,14, 15 आणि 19 मध्ये 157 पैकी 57 जणांनी माघार घेतली आहे. प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 100 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 16,17,18 आणि 22 मध्ये 176 पैकी 70 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तेथे एकूण 106 उमेदवार राहिले आहेत. प्रभाग क्रमांक 2,6,8 आणि 9 मध्ये 145 पैकी 54 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्या चार प्रभागांत एकूण 91 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 25,26, 28, व 29 मध्ये 124 पैकी 63 इच्छुकांनी माघार घेतली आहे. एकूण 61 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.
प्रभाग क्रमांक 3,4,5 आणि 7 मध्ये 86 पैकी 33 जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. प्रत्यक्ष निवडणूक आखाड्यात सर्वांत कमी 53 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 1,11,12 व 13 मध्ये 147 पैकी 43 इच्छुकांनी माघार घेतली आहे. प्रत्यक्ष मैदानात 104 उमेदवारा उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. प्रभाग क्रमांक 21,23,24 व 27 मध्ये 100 पैकी 40 इच्छुकांनी माघार घेतली आहे. एकूण 60 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढणार आहेत. प्रभाग क्रमांक 20,30,31 व 32 मध्ये 200 पैकी 83 जणांनी माघार घेतली आहे. सर्वाधिक 117 उमेदवार प्रत्यक्ष मैदानात आहेत.