

पिंपरी: जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि नवोदित जोडप्यांसाठी हा सण काही खास असतो. या दिवशी हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा आहे. मात्र, हल्ली सोशल मीडियावर रिल्स आणि फोटोसाठी या दागिन्यांची क्रेझ वाढली आहे. काळ्या रंगाच्या पोशाखावर पांढऱ्या शुभ रंगाचे हलव्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतात.
हे दागिने मुख्यत: महिलांसाठी तयार केले जातात, पण काही ठिकाणी पुरुषांनाही याचा वापर केला जातो. काही लोक हलव्याचे गोड पदार्थ एका ठराविक आकारात कट करून हार, बांगड्या, अंगठ्या अशा विविध गोड दागिन्यांचे रूप देतात. दागिन्यांच्या विविध आकारामुळे हा प्रकार अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे संक्रातीला अद्याप दहा ते बारा दिवस शिल्लक असले तरी दुकानांमध्ये आणि ऑनलाईन याची विक्री सुरू झाली आहे.
मकर संक्राती दिवशी हळदी-कुंकू समारंभ असतो त्याबरोबरच लेकी, सुना, नातवंडं, जावई यांचे हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते. या दागिन्यांचा वापर पारंपरिक पूजा, विवाह सोहळे आणि इतर धार्मिक कार्यक्रमासाठी केला जातो.
आधुनिक बदल आणि हलव्याचे दागिने
काळाच्या बदलासोबत हलव्याच्या दागिन्यांमध्येदेखील काही बदल घडले आहेत. पूर्वी हलव्याच्या दागिन्यांची बनावट साधी होती; परंतु आजकाल त्यात जास्त सर्जनशीलता, आधुनिक डिझाइन आणि रंगांची भर घालण्यात आलेली आहे. हलव्याच्या दागिन्यांमध्ये लोखंडी, चांदी आणि सोन्याचा वापर केल्याने त्यात अधिक आकर्षक दिसतात. पारंपरिक दागिन्यांना आधुनिक डिझाइनची जोड दिल्याने यामध्ये विविध प्रकरार पहायला मिळतात.
हे दागिने कोण घालतात?
नवविवाहीत जोडपे, बालके आणि गर्भवती महिला हलव्याचे दागिने घालतात. मात्र, हल्ली हौसेपोटी सर्वच हे दागिने घालून हौस पुरवून घेतात.
हलव्याच्या दागिन्यांचे प्रकार
हलव्याच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, हार, मुकुट, नथ, कानातले झुमके, टॉप्स, केसांतील क्लिप, कमरबंद, बांगड्या आणि अंगठ्याचा समावेश असतो. लहान, साखरयुक्त पांढऱ्या हलव्याला इमिटेशन ज्वेलरीसह एकत्र करून हे दागिने बनवले जातात. पुरुषांसाठी खास बोचदेखील बनविला जातो.
महिलांसाठी खास मोहनमाळ, बुगड्या, बांगड्या, कंबरपट्टा, नथ, मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, नेकलेस, बिंदी अशा विविध प्रकारच्या व्हारायटी हलव्याच्या दागिन्यामध्ये तयार केल्या जातात. महिलांसाठी असणाऱ्या यासंपूर्ण सेटची किंमत हजार ते पधंराशे रूपयांपर्यंत आहे. तसेच लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी देखील दागिने उपलब्ध आहेत.
मेघाराणी तोडकरी (विक्रेत्या)