खासगी रुग्णालयात सर्पदंशासाठी योजना लाभात अडचणी Pudhari
पिंपरी चिंचवड

Snakebite treatment: खासगी रुग्णालयात सर्पदंशासाठी योजना लाभात अडचणी; सरकारी उपचारांचे महत्त्व

सर्पदंश झालेल्या रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे; खासगी रुग्णालयात खर्चाचा समावेश योजना अंतर्गत होत नाही

पुढारी वृत्तसेवा

पंकज खोले

पावसाळ्यानंतर सर्पदंशाच्या अनेक घटना घडतात. सर्पदंशाला नेमका किती काळ झाला, कोणता सर्प आहे यावर उपचारपद्धती अवलंबून असते. यासाठी खासगी रुग्णालयात लाखात खर्च येऊ शकतो. शासनाच्या आरोग्य योजनांत सर्पदंश झाल्यानंतर विषाचा परिणाम थेट हृदयापर्यंत अथवा किडनीपर्यंत होत नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्तीला योजनांची मदत मिळत नसल्याचे समोर आले आहे. (Latest Pimpri chinchwad News)

रुग्णांची खासगी रुग्णालयाकडे धाव

सर्पदंशावर उपचार हा कोणत्याही सरकारी नियमात बसत नाही. संबंधित रुग्णाची प्रकृती खाल्यावल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योजनात समावेश होतो. त्यामुळे या योजनांचा थेट कोणताही फायदा अशा रुग्णांना होत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्ती सरकारी अथवा महापालिका रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. सरकारी योजना जिल्हा रुग्णालय तसेच, खासगी रुग्णालयास लागू आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधाीत 270 जणांना संर्पदंश झाला आहे. त्यापैकी 31 जणांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. तर, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यात सर्वांधिक म्हणजे 78 जणांना संर्पदंश झाला आहे. त्यापैकी 7 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

दर सहा तासाला दहा डोसची मात्रा सर्पदंशानंतर किती विष शरीरात गेले, सर्पदंश होऊन किती कालावधी झाला; तसेच हृदयापासून दंश किती अंतरावर झाला आहे, त्यानुसार डोसची मात्रा ठरविली जाते. विषारी सर्पदंशाची खात्री असल्यास संबंधितास लगेचच दहा डोस दिले जातात. त्यानंतर रुग्णाची स्थिती पाहून दर सहा तासांनंतर डोसची मात्रा ठरविली जाते. रुग्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्यास पुन्हा दहा डोस दिले जातात. विषाचा परिणाम कमी होत नाही. तोपर्यंत त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येते.

रुग्णसंख्येत वाढ

मावळ, मुळशी भागातील खासगी रुग्णालयात हिवाळा व उन्हाळा या दोन काळात सर्पदंश रुग्णांचे प्रमाण अधिक असते. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णांची प्रकृती खालावते. त्याच्यावर पुढील उपचार व अनेकदा गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया करावे लागते. ती परिस्थिती येईपर्यंत संबंधित रुग्णाला सरकारी योजनांची वाट पाहवी लागते, असे भीषण वास्तव समोर आले आहे.

भीतीनेच प्रकृती जास्त खालावते

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच परिसरात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. ग्रामीण भागात घडतात. हिवाळ्यात घोणस, तर उन्हाळ्यात नाग दंशाचे प्रमाण अधिक असते. इतर सर्प हे बिनविषारी असेल तरी संबंधित व्यक्तीची प्रकृती भितीने खालावते. त्यामुळे संबंधित रुग्णाला खासगी रुग्णालयात दोन दिवस देखरेखखाली ठेवावे लागते. जिल्ह्यातील ग््राामीण व महापालिकेच्या रुग्णालयात या उपचारासाठी कोणतीही फी अथवा पैसे स्वीकारले जात नाहीत. मात्र, सर्पाच्या विषाचे प्रमाण, दंशानंतर उपचाराला लागलेला वेळ यामुळे रुग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. अथवा इतर शस्त्रक्रियादेखील करावी लागते.

सर्पदंशाबाबत काही नियम घालून दिले आहेत. सर्पदंशानंतर रुग्णाच्या प्रकृतीनुसार सरकारी योजनांची मदत मिळू शकते. सापांचे विष कोणत्या प्रकाराचे आहे. ते आंतरइंद्रीयावर परिमाण करत असेल, तर व्हेटिलेटर लागते. मात्र, डॉक्टरांच्या अहवालानुसार त्याचा योजनात समावेश होऊ शकतो. त्यापूर्वीचे सिरम, डोसचा खर्च रुग्णाला करावा लागतो.
शरद पाटील, प्रशासक, खासगी रुग्णालय

...तरच योजनेत समावेश

सर्पदंशावर रुग्णाला खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर औषधोपचार व रुग्णालयातील खर्च योजनेत लागू होत नाही. व्हेंटिलेटर ठेवल्याचे अथवा त्याचा परिणाम हृदयावर किंवा इतर इंद्रियावर झाल्याचे सिद्ध झाल्यास त्या खर्चाचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केला जातो.

सर्पदंश झालेल्यांची माहिती (वायसीएम)

जानेवारी ते सप्टेंबर 2025 : 270

आयसीयूत दाखल : 31

मृत्यू : 2

सर्पदंशावरील उपचार होणारे रुग्णालय

पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालय, औध जिल्हा रुग्णालय, कर्मचारी राज्य विमा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय 28

नागरिकांना सर्पदंश झाल्यानंतर शक्यतो जवळच्या महापालिकेच्या अथवा जिल्हा रुग्णालयात जावे लागते. तेथे अधिक चांगल्या प्रकारे उपचार होऊ शकतात. कोणत्याही प्रकारची सरकारी योजना थेट लागू नसल्याने रुग्णांना आर्थिक फटका बसतो. सर्पमित्रांनादेखील कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही.
साईदास कुसाळ, सर्पमित्र
सर्पदंश झाल्यानंतर रूग्णावर महापालिकेच्या रुग्णालयात सर्व उपचार मोफत होतात, परंतु रुग्णाने प्रथम महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे आहे. जर रुग्णाने खासगी रुग्णालयात सर्पदंशावर उपचार घेतले असल्यास त्याला पुढील अन्य उपचाराचा खर्च करावा लागतो.
डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरीक्त वैद्यकीय अधिकारी, वायसीएम रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT