

Moshi ATS raid Young Man Arrested
पिंपरी : मोशीतील बोऱ्हाडेवस्ती परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) गुरुवारी (दि. ९) सकाळी छापा मारून कारवाई केली. पथकाने एका संशयित युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून लॅपटॉप, कागदपत्रे, इतर साहित्य जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दानिश सय्यद उर्फ हुसेन अब्दला असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सकाळी अचानक बोऱ्हाडेवस्ती येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान संशयित दानिश सय्यद याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या फ्लॅटमधून लॅपटॉप, दस्तऐवज आणि काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संशयिताने फ्लॅट भाड्याने घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
या कारवाईदरम्यान स्थानिक पोलिसांना अधिकृतरीत्या कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नव्हती. याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता “राज्य दहशतवाद विरोधी पथकाने स्वतंत्ररीत्या ही कारवाई केली असून, आमच्याकडे या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही,” असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडेच पुण्यात एटीएसकडून केलेल्या कारवाईनंतर पिंपरी-चिंचवड परिसरातही छापेमारी झाल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. संशयित युवकाविषयी अधिकृत माहिती व त्याच्यावर कारवाईचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.