

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सध्या 697 गावांचा समावेश आहे. मात्र, त्यात आता नव्याने जवळपास 163 गावांची भर पडणार आहे. बारामती आणि पुरंदर हे दोन संपूर्ण गावे प्राधिकरणाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे पीएमआरडी अंतर्गत जवळपास 900 गावांचा भार पडणार आहे. त्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, शासनाकडून अंतिम निर्णय होणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पीएमआरडीएअंतर्गत 9 तालुक्यांचा समावेश आहे. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडचे शहरे, मावळ, मुळशी, हवेली, तसेच भोर, शिरुर, दौंड, खेड, वेल्हे आणि पुरंदरच्या तालुक्यातील काही निवडक गावांचा समावेश आहे. त्यातील बांधकाम परवानगीसह इतर रस्त्याबाबत पीएमआरडीएचा हातभार असतो. तसेच, सुनियोजित नागरीकरणासह विकासकामांसाठी निधी पीएमआरडीए खर्च करते.
बारामती तालुक्याचे नागरिकरण वाढले आहे. तसेच, पुरंदरचा तालुक्यातील काही गावात कामे, नियोजन करण्यास अडचणी येत असल्याने संपूर्ण पुरंदरचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. तर, बारामतीदेखील पीएमआरडीएमध्ये समावेशाची मागणी आहे. पुणे शहरालगत असलेल्या या दोन तालुक्यांचा विकास होणे अपेक्षित असताना ही गावे निश्चित करण्यात आली आहेत.
बारामतीचे 113 तर पुरंदरची 50 गावे जोडणार
बारामती तालुक्यात जवळपास 113 महसुली गावांची नोंद आहे. तर, या ठिकाणी नगर परिषद व नगरपंचायतदेखील अस्तित्वात आहे. त्यामुळे ती गावे बारामतीमध्ये जोडण्यात यावी, असे नियोजन पीएमआरडीने आखले आहे. तर, वेल्हातील काही गावे पीएमआरडीतून कमी झाली आहेत. पुरंदरच्या 108 गावांपैकी साधारणे 50 गावे समाविष्ट नव्हती. तीदेखील आता जोडली जाणार आहेत.
बारामती तालुक्यानंतर पुरंदरच्या सर्व गावांचा समावेश करण्याबाबत प्रस्ताव आहे. शासनाकडून अंतिम निर्णय झाल्यावरच त्यावर कार्यवाही होईल. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात गावांची संख्या वाढणार आहे.
डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए