

पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील निवासी विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा व्हिडीओ बघून राज्यभरात खळबळ उडाली. लहानग्या विद्यार्थ्यांना ओळीत उभे करून वरच्या वर्गातील विद्यार्थी लेदरचा पट्टा आणि बॅटने अमानुष मारहाण करण्याचा प्रकार या व्हायरल व्हिडीओतून समोर आला.(Latest Pimpri chinchwad News)
दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत शिक्षक आणि रेक्टरकडून 16 विद्यार्थ्यांना काठी व पाईपने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी सुहेल सुधीर शेटे (रा. कुरळप) आणि अभिषेक सुभाष माने (रा. सांगाव) या दोन शिक्षकांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
वाठार-वारणानगर रस्त्यालगत तळसंदे (ता. हातकणंगले) येथे शामराव पाटील शिक्षण समूह आहे. इयत्ता पहिली ते बारावी तसेच आयटीआयपर्यंतचे सुमारे 900 हून अधिक निवासी व अनिवासी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. बुधवारी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वसतिगृह निरीक्षक राहुल रामचंद्र कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर 9 मार्च 2025 रोजी मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाला.
यात काही लहान विद्यार्थ्यांना वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी लेदरचा पट्टा, क्रिकेटची प्लास्टिक बॅट तसेच हातांनी अतिशय अमानुष आणि क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना ओळीत उभे करून लेदरच्या पट्ट्याने एकामागोमाग एक झोडपले जात असल्याचे दिसते. या शिक्षण संस्थेत अनेक वर्षापासून वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होत असल्याचाही आरोप आहे.
रेक्टर, शिक्षकांकडूनही मारहाण
शिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या चौकशीदरम्यान जुन्या व्हिडिओतील घटनांवरून नवीन माहिती पुढे आली. यामध्ये 16 विद्यार्थ्यांना शिक्षक व रेक्टर यांनी काठी आणि पाईपने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व पीडित विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली.
संबंधितांवर पूर्वीच कारवाई; यापुढेही खबरदारी घेणार : संस्थाध्यक्षा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ जुना असून हा प्रकार घडला त्यावेळी संबंधित विद्यार्थी व वसतिगृह निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून दक्षता घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया संस्थेच्या अध्यक्षा सौ. रूपाली पाटील यांनी दिली.