

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेची प्रभागनिहाय सोडत बुधवारी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या पीठासनाखाली तसेच तहसीलदार विक्रम देशमुख व मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. लोणावळा नगर परिषदेसाठी या वेळी 13 प्रभाग व 27 सदस्य संख्या असणार आहेत. यापैकी पहिले 12 प्रभाग 2 सदस्य संख्या असलेले व तेरावा प्रभाग 3 सदस्य संख्या असलेला असणार आहे.
लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी (प्रभाग क्रमांक 3, 4, 8, 9) हे आरक्षित झाले असून, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक 11 आरक्षित झाला आहे. नागरिकांचा मागास वर्ग महिला यासाठी 4 प्रभाग आरक्षित आहेत. तर, तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी असणार आहे. सर्वसाधारणपैकी 7 जागा महिलांसाठी असून, 8 जागा सर्वसाधारण असणार आहेत. शाळेचे विद्यार्थी शिवम खंडाळे व पूजा वाघ यांच्या हस्ते आरक्षण चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आरक्षणे जाहीर होताच काही जणांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. तर, काहींचा प्रभाग आरक्षित झाल्यामुळे हिरमोड झाला. अनेक प्रभागांमध्ये मातब्बर उमेदवारांना त्यांच्यासोबतचा इतर उमेदवार शोधावा व सोबत घ्यावा लागणार आहे.
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चिती करण्यात आली. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 8 जागा तर सर्वसाधारण महिलांसाठी 8 जागा निश्चित झाल्या.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 तर मागास प्रवर्ग महिलांसाठी 4 जागांवर आरक्षणाचे शिक्कामोर्तब करण्यात आले. अनुसूचित जाती 1 व अनुसूचित जाती महिला 1 तसेच अनुसूचित जमाती 1 आणि अनुसूचित जमाती महिला 1 हे 28 जागांचे आरक्षण निवडणुकीसाठी लागू करण्यात येणार आहे.
बुधवारी नगर परिषदेच्या सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, नगर परिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि उपमुख्यधिकारी ममता राठोड उपस्थित होते. उपस्थितांसमोर, नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी वैशनी ताकड, सई शेजवळ, नेहा चौहान, आराध्या भालेकर आणि उमेजा हसन पासडे यांच्या हस्ते प्रत्येक जागेसाठी आरक्षण सोडतीसाठी चिठ्ठी काढण्यात आली.
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी काढण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीमध्ये निवडणूक आयोगाच्या फेर निर्णयामुळे अनुसूचित जाती व जमातीचे पूर्वीचेच प्रभाग पुन्हा आरक्षित राहिले असून, तब्बल 8 प्रभागांमध्ये तेच आरक्षण कायम राहिले आहे. तर, जवळपास 11 माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी निर्माण झाली आहे.