वडगाव मावळ: मावळच्या जनतेने तुम्हाला मतदान का करायचे, असा सवाल करत आमदार सुनील शेळके यांनी भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली. दरम्यान, पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. तालुक्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत विकासकामे करण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन आमदार शेळके यांनी वडगाव मावळ येथे झालेल्या सभेत दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग््रेास, रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युतीच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज आज शक्तिप्रदर्शन करून दाखल करण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या सभेत आमदार शेळके बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे, स्वाभिमानी रिपाइंचे अध्यक्ष रमेश साळवे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, सारिका शेळके, नगराध्यक्षा अबोली ढोरे, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, युवक अध्यक्ष किशोर सातकर उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले, राज्यात आम्ही युती म्हणून काम करतोय. मग, तालुक्यात संघर्ष कशाला हवा, यासाठी युती करण्याचा प्रयत्न नगर परिषद निवडणुकीत केला होता. पण त्या निवडणुकीतील अनुभव घेऊन या निवडणुकीत भाजपसोबत युती करायची नाही, असा निश्चय केला असून, या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करू नका, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला.
रमेश साळवे म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्टवादीसोबत होतो. आताच्या निवडणुकांमध्येही ही भूमिका कायम असून, पंचायत समितीवर आपलाच सभापती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणेश खांडगे म्हणाले, आमदार शेळके यांच्या माध्यमातून तालुक्याला विकासस्पर्श झाला आहे. कुस बदलल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. याचा परिणाम या निवडणुकांमध्ये मतांच्या रूपाने दिसला पाहिजे, असे आवाहन केले. नारायण भालेराव यांनीही रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादीसोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी केले.
शक्तिप्रदर्शनप्रसंगी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने!
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वतीने वडगाव शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या वतीने भव्य रॅली काढून पंचायत समिती समोरील चौकात जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा अखेरच्या टप्प्याकडे असताना भाजपची रॅली ही चौकात दाखल झाली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. तसेच सभा चालू असलेल्या ठिकाणापासूनच भाजपा कार्यकर्ते तहसील कार्यालयाकडे जमावाने निघाले. त्यामुळे काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.