

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेला भष्टाचार थांबविण्यासाठी आम्हाला मते द्या, असे प्रत्युत्तर देत भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर आज टीकास्त्र सोडले.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज भरण्यापूर्वी भाजप शिवसेनेच्या वतीने शक्तिप्रदर्शन करून तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, निवडणूक प्रचार प्रमुख बाळासाहेब नेवाळे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, माजी जिल्हा परिषद सभापती बाबूराव वायकर, माजी सभापती शांताराम कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, सुभाषराव जाधव, प्रशांत भागवत आदी उपस्थित होते.
गणेश भेगडे म्हणाले, विकासासाठी एव्हढे पैसे आणले असे सांगता मग मतांसाठी पैसे का वाटता, असाही सवाल केला. तालुक्यात जलजीवन पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची कामे आदी कामांमध्ये झालेला भष्टाचार रोखण्यासाठी आम्ही निवडणुकीला समोरे जात असून, निवडणूक जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब नेवाळे यांनीही आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केला. त्यांनी पगारी आणि निवडणूक प्रक्रियेत महिलांना पुढे करून कार्यकर्ता संपवला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचे अस्तित्वच संपले आहे. त्यांच्यामागे इतका मोठा जनाधार आहे. मग पोलिस संरक्षणाची गरज काय असाही सवाल नेवाळे यांनी केला. या वेळी निवृत्ती शेटे यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले.
जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे
टाकवे बु - नाणे गट : मधुकर लहू कोकाटे
वराळे - इंदोरी गट : मेघा प्रशांत भागवत
खडकाळा - कार्ला गट : आशा बाबुराव वायकर
कुसगाव - काले गट : दत्तात्रय शंकर गुंड
सोमाटणे - चांदखेड गट : शीतल अविनाश गराडे
पंचायत समिती गणनिहाय अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे
टाकवे बु. गण : अश्विनी सोमनाथ कोंडे
नाणे गण : संगीता ज्ञानेश्वर आढारी
इंदोरी गण : श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे
वराळे गण : रविंद्र निवृत्ती शेटे
कार्ला गण : रंजना सुरेश गायकवाड
खडकाळा गण : प्रकाश बाबूराव गायकवाड
कुसगाव गण : नवनाथ पांडुरंग हरपुडे
काले गण : शीला मुकुंद ठाकर
सोमाटणे गण : बाळासाहेब नथू पारखी
चांदखेड गण : सुवर्णा बाळासाहेब घोटकुले