

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानांतील खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. तुटक्या खेळण्यांमुळे येथे येणाऱ्या बालगोपाळांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जीव धोक्यात घालून लहान मुले खेळत असल्याचे चित्र उद्यानात दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी धोरणामुळे खेळणी दुरुस्तीचा मुहूर्त लागत नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेचे शहरातील सर्वच भागांत सार्वजनिक उद्याने आहेत. बालगोपाळांना खेळण्यासाठी सर्वच उद्यानांत वेगवेगळ्या प्रकारांची खेळणी बसविण्यात आली आहेत. लोखंड, पत्रा आणि प्लास्टिकमध्ये तयार केलेल्या त्या खेळणी आहेत. मात्र, अनेक वर्षे झाल्याने तसेच, दुरूस्ती न केल्याने बहुतांश खेळण्यांची दुरवस्था झाली आहे.
लहान मुले त्या तुटलेल्या धोकादायक खेळण्यांवर बसतात. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. खेळणीचा तुटलेला धारदार भाग मुलांना लागल्यास त्यांना इजा होऊ शकते. तुटलेल्या खेळण्यांवरून पडून लहान मुले जखमी होऊ शकतात.
यासंदर्भात नागरिकांनी महापलिका प्रशासन तसेच, उद्यान विभागांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून खेळणी देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, लहान मुलांना तुटलेल्या खेळणीसोबत खेळावे लागत आहे. खेळणी दुरूस्ती व देखभालीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तुटलेल्या खेळणीसोबत लहान मुले खेळतात
क्षेत्रीय कार्यालयातील गौतमबुद्ध उद्यान व बी.डी. किल्लेदार उद्यान, फ क्षेत्रीय कार्यालयतील कृष्णानगर येथील साई कृष्णा उद्यान आणि रहाटणी येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान या उद्यानांसह इतर अनेक उद्यानांतील खेळणी तुटलेली आहेत. अशा तुटलेल्या व धोकादायक खेळण्यांवरच लहान मुले व मुली खेळत असतात. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने खेळणी दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.