

मोशी: हिवाळा आता संपत आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील हवामानात बदल होत आहे. असे असतानाच चिखली परिसरातील नागरिक धुळीच्या प्रचंड सामाज्यामुळे हवालदिल झाले आहेत. चिखलीतील अंतर्गत रस्ते आणि मुख्य मार्गांवर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
विशेष म्हणजे महापालिकेकडून धूळ कमी करण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या फॉगर मशीन या भागात फिरतच नसल्याची तक्रार ग््राामस्थांनी केली आहे. वारंवार पाठपुरावा करून आणि तक्रारी देऊनही प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या धुळीमुळे श्वसनाचे विकार, खोकला आणि डोळ्यांच्या जळजळीचे प्रमाण वाढले असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यांवर साचलेली माती आणि वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारे धुळीचे लोट यामुळे घरांच्या खिडक्या उघडणेही आता अशक्य झाले आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना ही आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
रस्त्याने प्रवास करणे होतेय कठीण
चिखली परिसरात बहुतांश ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. ज्या भागात कामे सुरू नाहीत तेथे आरोग्य विभागाकडून रस्त्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे परिसरात धुळीचे सामाज्य वाढले आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करताना दुचाकीचालक, पादचारी यांना प्रवास करणे कठीण झाले आहे. अनेकदा गाडी चालविताना धुळीचे कण डोळ्यात जाऊन दुचाकीचालकांना अपघात घडत आहेत. डोळ्यांना इजा होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने चिखली परिसरातील रस्त्याची त्वरित साफसफाई करून रखडलेली व संथगतीने सुरू असलेली काम लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी होत आहे.
आमच्या परिसरात धुळीचे इतके सामाज्य आहे की, श्वास घेणे कठीण झाले आहे. महापालिकेच्या फॉगर मशीन फक्त मुख्य चौकांमध्ये दिसतात. आमच्या अंतर्गत रस्त्यांकडे कोणीही फिरकत नाही. तक्रार करूनही अधिकारी फक्त आश्वासन देतात. प्रत्यक्षात काहीच कारवाई होत नाही.
विलास देशमुख, स्थानिक नागरिक
शहरातील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. बांधकामे आणि रस्त्याचे काम चालू असल्यामुळे या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. तरी तातडीने फॉगर मशीन पाठविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
संजय कुलकर्णी, सह-शहर अभियंता, पर्यावरण