

पिंपरी: पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय), आशियाई सायकलिंग महासंघ (एसीसी) आणि आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ (यूसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ पिंपरी-चिंचवड शहरातून जात आहे. ‘टूर डी फ्रान्स’च्या धर्तीवर प्रथमच पुणे जिल्ह्यात ही स्पर्धा होत असून शुक्रवारी (दि. 23) स्पर्धेतील चौथा टप्पा होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
स्पर्धेचा मार्ग पिंपरी-चिंचवड व पुणे शहर हद्दीतून जाणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.
यातून पोलिसांची वाहने व स्पर्धेशी निगडित वाहने वगळण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण स्पर्धा मार्ग ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. स्पर्धा कालावधीत संबंधित मार्गांवर नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बावधन, सांगवी, वाकड, निगडी, पिंपरी व चिखली या वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या मार्गांवर 93 ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी या कालावधीत स्पर्धा मार्ग टाळून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नागरिक आणि वाहनधारक व चालकांनी सहकार्य केल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन होण्यास मदत होईल, असे पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले आहे.