भोसरी: गव्हाणे उद्यानाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. उद्यानातील मोडकळीस आलेली खेळणी, परिसरात दारूच्या बाटल्या, प्रेमीयुगुलांचा वाढता वावर, तुटलेल्या पेव्हिंग ब्लॉक्स, मधोमध लावलेली झाडे आदी समस्यांनी उद्यानाला घेरले आहे. परिसरात एकमेव उद्यान असल्याने त्याची झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालिका प्रशासन व उद्यान विभागाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व महिला वर्गातून होत आहे.
आदिनाथनगर, गव्हाणे वस्ती येथे नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने कै. वामनराव गव्हाणे (पाटील) उद्यानाची निर्मिती करण्यात आली. परिसरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक नियमितपणे खेळण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी येत असतात. गव्हाणे उद्यानाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिसरात दारूच्या बाटल्या आढळून येत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उद्यान परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यामुळे महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कुटुंबासोबत सुरक्षितपणे वेळ घालवण्याची सुविधा याठिकाणी राहिली नसल्याची तक्रार प्रामुख्याने महिला मंडळी करत आहेत. परिणामी परिसरातील ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
तक्रारींना केराची टोपली
उद्यानात सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी ज्येष्ठ नागरिक येत असतात. नागरिकांना तुटलेल्या पेव्हिंग ब्लॉक्समुळे चालणेही अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मोडकळीस आलेली खेळणी लहान मुलांसाठी धोकेदायक ठरत आहेत. याबद्दल नागरिकांनी अनेकदा पालिकेच्या संबंधित विभागास येथील असुविधांबद्दल कळविले आहे. परंतु, संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. उद्यानाची स्वच्छता, मोडलेली खेळणी दुरुस्त करणे, पेव्हिंग ब्लॉक्सची डागडुजी आणि सुरक्षा यंत्रणा यावर प्रशासन उपाययोजना करणार का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित झाला आहे.
भोसरी येथील कै. वामनराव गव्हाणे (पाटील) उद्यानातील पेव्हिंग ब्लॉक्सची दुरुस्ती करण्यात येईल. नागरिकांची होणारी गैरसोय काही दिवसांत दूर होणार आहे.विजय जाधव, कार्यकारी अभियंता, मनपा
निविदाप्रक्रिया अंतिम टप्यात आहे. लवकरच याठिकाणी नवीन खेळणी बसविण्यात येणार आहेत. सुरक्षारक्षक पुरविण्याबद्दल महापालिकेच्या सुरक्षा विभागास कळविण्यात आले आहे.महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक, मनपा
सुरक्षारक्षक नसल्याने दुपारच्या वेळी प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. रात्री याठिकाणी मद्यपी दारू पीत बसतात. लहान मुलांचा खेळणींवर प्रेमीयुगुल चाळे करत असतात. अनेकदा लहान मुलांना प्रेमीयुगल शिवीगाळ करतात. खेळण्यापासून मज्जव करतात. या सर्व प्रकाराला आळा कोण व कसा घालणार असा प्रश्न आहे.ज्येष्ठ नागरिक