

गणेश विनोदे
वडगाव मावळ: निवडणुकीसाठी काढलेल्या कर्जाचा पहिला हप्ता येऊन गेला, पण निकाल अजून नाही लागला असे म्हणण्याची वेळ वडगाव नगरपंचायत निवडणुकीत कर्ज काढून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांवर आली आहे. अजूनही निवडणूक निकालाला एक आठवडा बाकी असल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे.
मतमोजची पुढे ढकलल्याने नागरिकांचा हिरमोड
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी सर्वच प्रभागात चुरशीची लढत झाली. यामध्ये प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत पाहायला मिळाली. तसेच, पर्चेस व्होटिंगच्या फंडामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. दरम्यान, मतदानाच्याच दिवशी दुपारी मतमोजणी थेट 19 दिवस लांबणीवर पडल्याची बातमी आली आणि सगळ्यांचाच हिरमोड झाला. 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर लांबलेली मतमोजणी प्रक्रिया थेट 21 डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर झाले आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. मतदान झाल्याच्याच दिवशी आकडेमोड आणि चौकचौकातील चर्चा, पैजांना उधाण आले. चार-पाच दिवसांनी काही कार्यकर्त्यांना स्वप्नातही निकाल दिसू लागल्याची चर्चा झाली. याबाबतही दैनिक पुढारी वृत्त प्रसिद्ध केले होते.
कर्जामुळे उमेदवार हतबल
दरम्यान आता निवडणूक होऊन 13 दिवस झाले असून, अजूनही आठवडा बाकी असताना याच निवडणुकीसाठी काढलेल्या कर्जाचा पहिला हप्ता कट होऊन गेला; पण अजूनही निवडणुकीचा निकाल नाही लागला असे वक्तव्य एका हतबल झालेल्या उमेदवाराने दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले. त्यामुळे मतदानासाठी वाटेल तेव्हढा खर्च करणारे उमेदवार आता कर्जामुळे हतबल झाल्याचे दिसते.
दरम्यान, निवडणूक निकाल तीन सप्ताह लांबणीवर पडला होता, त्यापैकी दोन सप्ताह संपले असून, शेवटचा सप्ताह आज सुरू झाला. त्यामुळे अखेर पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून, खऱ्या अर्थाने निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. दिवस जवळ आल्याने पुन्हा एकदा थांबलेल्या चर्चांना वेग आला असून उत्सुकता जोर धरू लागली आहे.
विजयासाठी पैशाचा केला महापूर
पर्चेस व्होटिंग हा एकमेव फंडा ठरलेल्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीत एका मताला कमीत कमी 5 हजार, तर जास्तीत जास्त 20 हजार असा भाव मिळाला. त्यामुळे मतदार चांगलेच मालामाल झाले; पण कुठल्याही परिस्थिती निवडणूक जिंकायची ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पैशाचा महापूर करणाऱ्या काही उमेदवारांपुढे आता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.