

नवी सांगवी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगवीत मागील काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा, असा सवाल येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
महापालिकेच्या सांगवी येथील पाणीपुरवठा विभागाकडून दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. मात्र, गेली कित्येक वर्षे येथील नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा पहाटे पाच ते आठ या वेळेत होत असताना वेळी-अवेळी पाणीपुरवठा का होत आहे. तोही कमी दाबाने होत आहे. नवी सांगवीतच ही परिस्थिती का, असा सवालदेखील येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
शनिवारी पहाटे पाच वाजता वेळेत पाणीपुरवठा झाला. परंतु, तोही कमी दाबाने. त्यामुळे मुबलक पाणीपुरवठा न झाल्याने येथील स्थानिक नागरिकांना अपुरे पाणी पडले. रविवारी येथील परिसरात नियमित वेळेनुसार पहाटे होणारा पाणीपुरवठा अवेळी म्हणजेच सकाळी काही परिसरात दहा वाजता तर काही परिसरात अकरा वाजता पाणीपुरवठा करण्यात करण्यात आला. या वेळीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिक आणखी त्रस्त झाले.
अधिकाऱ्यांचे तक्रारींकडे दुर्लक्ष
मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा कधी होणार, पाण्याला प्रेशर का नाही, साठवणुकीच्या टाक्याही पूर्णपणे भरत नाहीत. आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा. एकदा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगावे तरी, असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रारी करून पाय झिजले; परंतु अधिकारीवर्ग दखल घेत नसल्याने तीव नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उच्चभ्रू सोसायट्या, इमारती असल्याने पहाटे पाच वाजता पाणी येणार असल्याने नागरिक चार वाजताच उठून पाण्याची वाट पाहात असतात. त्यातच वेळेत पाणी आले नाही तर झोपमोड तर होतेच, पण पुढील दिवसभराचे कामकाजाचे नियोजनदेखील विस्कळीत होते. संबंधित पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
दीपिका शितोळे, स्थानिक
या भागात आहे समस्या
नवी सांगवी येथील गणेशनगर, समतानगर, स्वामी विवेकानंदनगर, विवेकानंद सोसायटी, आदर्शनगर, राजारामनगर येथील परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा विभागाकडून पहाटे पाच वाजता नियमाने सोडण्याची वेळ आहे. मात्र, अनेकदा नियमित वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची सतत तारांबळ उडत आहे. याच परिसरात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने येथील स्थानिक नागरिक संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करीत आहेत.
शनिवारी सायंकाळी पिंपरी येथील रिव्हर रोडवरील पाण्याची मेन ग््रॉव्हिटी लाईन लीकेज झाली होती. दुरुस्तीच्या कामकाजासाठी तब्बल तेरा तास लागले. रविवारी सकाळी दुरुस्तीचे कामकाज पूर्ण झाले. या वेळी ग््रॉव्हिटी लाईनवरील सर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दोन दिवसांत पाणीपुरवठा नियमित वेळेत सुरळीत होईल.
साकेत पावरा, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग