

सोमाटणे: मावळ तालुक्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू होताच परिसरात धोकादायक ऊस वाहतुकीने पुन्हा डोके वर काढले आहे. कारखान्याकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून, नियम धाब्यावर बसवून वाहतूक केली जात असून, ही बेफिकीर प्रवृत्ती थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ठरत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
ऊस वाहतुकीसाठी ट्रक व ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी ट्रॅक्टरला अनधिकृतरीत्या दुसरी ट्रॉली जोडून दोन ट्रॉलींमधून ऊस वाहून नेला जातो. एका ट्रॉलीची अधिकृत क्षमता 14 टन असताना, प्रत्यक्षात 18 ते 20 टन ऊस भरला जात असल्याचे चित्र सर्रास दिसते. विशेष म्हणजे विनापासिंग ट्रॉलींचा वापर खुलेआम सुरू असून, साखर प्रशासन व संबंधित यंत्रणांचा यावर कुठलाही वचक दिसून येत नाही.
ट्रॉलींवर रिफ्लेक्टरचा अभाव
रात्रीच्या वेळी सुरू असलेली ऊस वाहतूक ही अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. अनेक ट्रॅक्टर व ट्रॉलींवर रिफ्लेक्टर, इंडिकेटर नसतात. काही ठिकाणी एकाच हेडलाइटवर ट्रॅक्टर सुसाट धावत असल्याने समोरून व मागून येणाऱ्या वाहनचालकांची मोठी फसगत होते. लांबून दुचाकी येत असल्याचा अंदाज बांधला जातो. मात्र. जवळ आल्यानंतर अचानक ट्रॅक्टर समोर आल्याने अपघात घडत आहेत.
अपघातामध्ये वाढ
शेतातून कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गांवर भरलेले ट्रक आणि दोन ट्रॉलींचे ट्रॅक्टर वेगात धावत असल्याने नागरिकांना अपघातासह वाहतूककोंडी, जीवितहानीचा धोका सहन करावा लागत आहे. ऊस वाहतूक नियमांबाबत वाहनचालकांची कोणतीही जनजागृती केली जात नसून, नियमांपेक्षा दुर्लक्षच अधिक दिसते. अपघात रोखण्यासाठी आरटीओ, वाहतूक पोलिस व साखर कारखाना व्यवस्थापनाने संयुक्तपणे कडक भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय ही बेफिकीर आणि जीवघेणी ऊस वाहतूक थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
साखर कारखान्याच्या प्रशासनास पत्रव्यवहार करून ऊस वाहतूक करताना वाहतुकीचे नियम पाळून ऊस वाहतूक करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ऊस वाहतूक वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
गणेश लोंढे, सहायक पोलिस निरीक्षक, तळेगाव वाहतूक विभाग