आकुर्डी: महापालिकेच्या उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांसाठी तयार केलेले आकुर्डीतील बालउद्यान रोडरोमिओ, टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, गुटख्यांच्या पिशव्या, रॅपर्स पडलेले दिसून येत आहे. तसेच, उद्यानातील खेळणीही तुटलेली दिसत आहे.
उद्यान बनले टवाळखोरांचा अड्डा
उद्यान विभाग प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून बालउद्यानाची दुरुस्ती व देखभाल करत पुनर्निर्मिती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी या बालउद्यानाकडे पाठ फिरवली आहे, कारण या ठिकाणीची खेळणी ही असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आहे. या ठिकाणी घसरगुंडी, झोका, भुईचक्र आदी खेळण्या नादुरुस्त, बिघडलेल्या, मोडकळीस स्वरूपात आल्या आहेत.
सध्या या उद्यानामध्ये खेळणी खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनाऐवजी महाविद्यालय तरुण-तरुणीचा एकांतवास व निवांत जागा म्हणून याचा लाभ घेतात. दुपारी व सायंकाळच्यावेळी उद्यानामध्ये तरुण-तरुणी घोळक्याने दिसून येतात. तर, काही नशेखोर आडोशाचा फायदा घेत दारू पित बसलेले दिसून येत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाइ करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
बालचमूंची गैरसोय
नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या खेळण्यामुळे लहान मुलांनी काही वर्षांपासून बालद्यानाकडे पाठ फिरवली आहे, परंतु या परिसरापासून लांब उद्याने असल्याने पालक मुलांना घेऊन तिथे जाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे उद्या जवळ असूनही मुलांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी उद्यान प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी नाल्यालगत असलेल्या उद्यानाच्या भिंतीवर तार कंपाउंड केल्यामुळे स्थानिक प्रतिनिधींकडून उद्यानाच्या सुस्थितीचा व दुरुस्तीबाबत दावा केला जात होता, परंतु ही फक्त अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून चमकोगिरी केले असल्याचे स्थानिकांचे निदर्शनास आले आहे.
प्रशासनाकडून नुकतेच काही दिवसांपूर्वी नैसर्गिक नाल्यालगत असलेल्या धोकादायक भिंतीवरती तारेचे कंपाउंड करून उद्यान बंदिस्त खेळ करण्यात आले आहे. लवकरच खेळण्याची दुरुस्ती करून आवश्यकतेनुसार साफसफाई केली जाईल. उद्यान दुरुस्ती व देखभालीच्या निविदाप्रक्रियाचे काम सुरू आहे. लवकरात लवकर उद्यानाचे काम सुरू करून बालकांसाठी खुले जाईल. उद्यानात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी वेळोवेळी उद्यान विभागातील अधिकारी गस्त घालतील.राजेश वसावे, अधीक्षक, उद्यान विभा, महापालिका