पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांत वाहने आदळून लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. आता, शहरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन जखमी किंवा मृत्यू झाल्यास महापालिकेकडून भरपाई दिली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका प्रशासनाकडून ही कार्यवाही केली जात आहे.
शहरातील मुख्य तसेच, अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महामेट्रोकडून पिंपरी ते निगडीच्या शक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत काम सुरू असल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. तसेच, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निगडी ते दापोडी मार्गावरील बीआरटी मार्गावर भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बीआरटी मार्ग उखडून टाकला आहे. चौकात खोदकाम करण्यात येत आहे. तसेच, विद्युत, ड्रेनेज, शहरी दळणवळण, स्थापत्य, स्मार्ट सिटी कंपनी आणि मोबाईल नेटवर्किंग कंपन्यांकडून सातत्याने रस्ते खोदण्यात येत आहेत. काम झाल्यानंतर चांगल्या प्रकारे खोदकाम न केल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. तसेच, काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने भेगा पडल्या आहेत.
महापालिकेकडून डांबर, पेव्हिंग ब्लॉक, खड्डी या माध्यमातून रस्ते दुरूस्त केली जात आहेत. मात्र, ती जास्त दिवस टिकत नसल्याने पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. या खड्ड्यात पडून लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यात वाहनचालक व पादचारी जखमी होत आहेत. तसेच, काही जीव घेणे अपघातही घडले आहेत. तसेच, धुळीचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. जखमी आणि मृत्यू झाल्यास महापालिकेकडून भरपाई देण्यात येणार आहे. त्यासाठी तक्रारदारास पुरावे सादर करावे लागणार आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती त्या तक्रारीची चौकशी करणार आहे. तो अपघात महापालिका, ठेकेदार व इतर कोणत्या कारणांमुळे झाला, याची चौकशी केली जाणार आहे. सर्व पुरावे तपासले जाणार आहेत. शहानिशा झाल्यानंतर तक्रारदाराला महापालिकेकडून भरपाई दिली जाणार आहे. त्यात ठेकेदार दोषी असल्यास त्यांच्याकडून ती रक्कम वसुल केली जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची सांगितले.
जखमींना मिळणार 50 हजार ते अडीच लाखांची भरपाई
शहरात एकूण 2 हजार 250 किलोमीटर अंतराचे डांबरी आणि काँक्रीटचे रस्ते आहेत. रस्त्यांवरील खड्डयामुळे अपघात होऊन जखमी किंवा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका नुकसान भरपाई देणार आहे. जखमीला 50 हजार ते 2 लाख 50 हजारांपर्यंत मोबदला दिला जाणार आहे. तर, मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख रुपये मोबदला महापालिका देणार आहे. हा मोबदला 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीपासून पुढे झालेल्या अपघातील प्रकरणात दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधिताला महापालिका भवनातील शहर अभियंता कार्यालयात आवश्यक पुराव्यासह अर्ज सादर करावा लागणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेडून कार्यवाही
मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताप्रकरणी जनहित याचिकेवर 13 ऑक्टोबर 2025 ला सुमोटो निर्णय दिला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यात अपघात झाला आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने संबंधित जखमी किंवा मयताच्या वारसास भरपाई द्यावी. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यातील अपघातात जखमी किंवा मयत झाल्यास महापालिकेकडून जखमी तसेच, मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या प्रकरणात सर्व पुरावे तपासून तक्रारदाला मोबदला देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.