ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेल किंमतींमध्ये वाढ होत आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ करण्यात आली. गेल्या आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर १११.७७ रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर, एका लीटर डिझेलसाठी १०२.५२ रुपये मोजावे लागत आहेत. पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर ११५.७३ रुपये इतका आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचा दर अनुक्रमे १०५.८४ आणि ९४.५७ रुपयांपर्यंत पोहचला आहे.
इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
ऑक्टोबर महिन्यात १३ वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल ३.८५ रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटरमागे ४.३५ रुपयांनी महाग झाले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर्स प्रतिबॅरल इतके होण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या एनव्हायएमई क्रूडचा दर ७८.१७ डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल ८१ डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड ९० डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा आंदाज तज्ज्ञांचा अंदाज आहे.