Navjot Singh Sidhu : सिद्धूचे सोनिया गांधींना पत्र : कॅबिनेट मंत्री करण्यासह १३ सूत्री अजेंडा | पुढारी

Navjot Singh Sidhu : सिद्धूचे सोनिया गांधींना पत्र : कॅबिनेट मंत्री करण्यासह १३ सूत्री अजेंडा

चंडीगढ, पुढारी ऑनलाईन

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu ) यांनी सोनिया गांधी यांना पत्र  लिहिले असून १३ नव्या कॅबिनेट मंत्र्यांसह १३ सूत्री अजेंड्याची आठवण करून दिली आहे. शनिवारीच सिद्धू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला होता.

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांना जी २३ नेत्यांना दम भरल्यानंतर सिद्धूसारखे बंडखोर नेते वरमतील, असे मानले जात होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी सिद्धू यांनी पत्र लिहून आपल्या मागण्या पुढे रेटल्या आहेत.

पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांच्या काही निर्णयांवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी थेट राजीनामाच दिला होता. चन्नी आणि अन्य नेत्यांनी त्यांची समजूत काढली. मात्र, त्यांनी राजीनामा मागे घेतला नव्हता. सिद्धूचे आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यात जाहीर बेबनाव होता.

सिद्धू यांनी बंड केल्यामुळेच पक्षांतर्गत नेतृत्वबल झाला. अमरिंदर सिंग यांना बदलल्यानंतर सिद्धू यांची वर्णी लागेल असे वाटत असतानाच अनपेक्षितपणे चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे सिद्धू नाराज होते. मंत्रिमंडळात सिद्धू यांच्या समर्थकांना डावलले होते. तसेच सिद्धू यांना नको असलेल्या अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागा मिळाल्याने सिद्धू पक्षावर संतापले होते. या बाबींवर मार्ग काढण्याचे पक्षाने आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देत पक्षाला पत्र पाठविले आहे.

 सुखबीरसिंग बादल यांनी केली होती टीका

नवज्योतसिंग सिद्धू हे दिशाहीन मिसाईल आहे. पंजाबच्या भल्यासाठी त्यांनी निमूटपणे मुंबईला जावे, अशी टीका शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी केली. ते म्हणाले, ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल असून त्यांना कुठे जायचे हेच माहीत नाही, हे मी आधीच सांगितले होते. त्यांनी आधी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजकीय बळी घेतला आता पक्षाला अडचणीत आणले आहे.

( Navjot Singh Sidhu ) राहुल गांधी यांच्याशी चर्चेनंतर राजीनामा मागे

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ननवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्‍यक्षपदाचा राजीनामा अखेर १८ दिवसांनंतर मागे घेतला आहे. त्‍यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर राजीनामा मागे घेण्‍याचा निर्णय घेतला, अशी माहिती पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी माध्यमांना दिली. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्यानंतर सिद्धू नाराज होते. चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यानंतर अचानक सिद्धू यांनी प्रदेशाध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वास्तविक अमरिंदर सिंग यांना हटविण्यात सिद्धू यांचा मोठा हात होता. त्यामुळे हे पद आपल्यालाच मिळेल, असे त्‍यांना वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. शिवाय समर्थक आमदारांना मंत्रिपदे आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून चन्नी यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. ते काँग्रेस सोडतील, अशी शक्‍यताही वर्तवली जात होती.

हेही वाचलं का? 

Back to top button