मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात मोठे षड्यंत्र सुरू आहे; परंतु विरोधकांचा प्रत्येक कट उधळून लावला जात आहे. आता शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आली आहे, असा इशारा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज दिला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राणा दाम्पत्यांना वांद्रे न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचण्यास कुणाचीही विरोध नाही. तुम्ही कारागृहात बसूनही हनुमान चालिसा वाचू शकता, असा खोचक टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याना लगावला.
कट कारस्थान होत असतील, तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असतो. धर्माच्या नावाखाली कारस्थान केली जात आहेत. राज्यात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. नवनीत राणांनी याआधी संसदेत श्रीरामाच्या नावाला विरोध केला होता.बोगस जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या व्यक्तीला तुम्ही सुरक्षा देता. हा जनतेचा, संविधानाचा अवमान आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.
बोगस जात प्रमाणपत्रावर निवडून येणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृतीच्या व्यक्तीला भाजप पाठिंबा देत असल्याची टीका करून राणा दाम्पत्याच्या प्रकरणात सरकार हस्तक्षेप करत नाही. मुंबई पोलीस राजकीय दबावाखाली काम करत नाहीत. हा न्यायालयाचा निर्णय आहे. मातोश्री शिवसैनिकांचे बलस्थान आहे. मातोश्रीवर चालून येणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
हेही वाचलंत का ?