राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, २९ एप्रिल रोजी होणार जामीन अर्जावर सुनावणी | पुढारी

राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, २९ एप्रिल रोजी होणार जामीन अर्जावर सुनावणी

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. आज (रविवार) त्या दोघांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयाने  पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल, असे सांगितले. दरम्यान, जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात,  तर रवि राणा यांना आर्थर रोड तुरुंगात  ठेवण्यात येणार आहे. त्या दोघांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता २७ एप्रिलला सरकारी पक्ष युक्तीवाद करणार आहे. राणा दाम्पत्यांच्या विरोधातील एफआयआरचे वाचन करून ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. तर राणा दाम्पत्यांच्या बाजूने ॲड. रिझवान मर्चंट यांनी युक्तीवाद केला. अटक करण्‍यापूर्वी राणा दाम्‍पत्‍याला यांना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. त्यांच्याविरोधात लावलेली कलमे बेकायदेशीर असल्याचे सांगून ॲड. मर्चंट यांनी त्यांच्या कोठडीस विरोध दर्शवला.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला खार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली होती. कलम १५३ (अ) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.

मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्य शनिवारी सकाळी हनुमान चालीसाचे पठन करणारे होते. परंतु, आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानासमोर ठिय्या मारला होता. शिवसैनिकांनी त्यांना घरातून बाहेर पडण्यापासून रोखनू धरले होते. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी राणा दांपत्याला घराबाहेर काढले. दरम्‍यान, रवि राणा बाहेर येताच घरासमोर जमलेल्या जमावातील एकाने त्यांच्यावर पाण्याची बाटली भिरकावली. घराबाहेर आल्यानंतर राणा दांपत्‍याने जय श्रीरामचा जयघोष केला. तर शिवसैनिकांनी आक्रमक होत प्रतिआव्हान दिले. दरम्यान, राणा दांपत्याला मोठ्या पोलिस बंदोबस्तात खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांनी राणा दांपत्‍याला राहत्या घरातून ताब्‍यात घेतले. यावेळी घरामध्ये पोलिस आणि राणा दांपत्‍य यांच्यात खडाजंगी झाली. दोघांनी पोलिसांकडे वॉरंटची मागणी केली होती.

हेही वाचलंत का ?   

 

Back to top button