प्रियांका गांधी यांनी २ कोटींचे चित्र विकत घेण्‍यास भाग पाडले : राणा कपूर यांची 'ईडी'ला माहिती | पुढारी

प्रियांका गांधी यांनी २ कोटींचे चित्र विकत घेण्‍यास भाग पाडले : राणा कपूर यांची 'ईडी'ला माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  येस बँकचे सह-संस्‍थापक राणा कपूर यांनी अंमलबजावणी संचालनालयास (ईडी) दिलेल्‍या माहितीत सोनिया गांधी कुटुंबीयांविरोधात धक्‍कादायक खुलासे केले आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणी विशेष न्‍यायालयात दाखल आरोपपत्रात म्‍हटलं आहे की, काँग्रेस नेत्‍या प्रियांका गांधी यांनी चित्रकार एम.एफ हुसेन यांचे चित्र खरेदी करण्‍यास भाग पाडले होते. तसेच या चित्राच्‍या विक्रीतून आलेल्‍या पैशातून न्‍यूयॉर्कमध्‍ये सोनिया गांधी यांच्‍या उपचारावर खर्च करण्‍यात आला होता.

सोनिया गांधी यांच्‍या उपचारावर खर्च

‘ईडी’ने दिलेल्‍या माहितीनुसार, येस बँकचे सह-संस्‍थापक राणा कपूर यांनी चौकशीवेळी ‘ईडी’ला माहिती दिली होती. यावेळी
त्‍यांनी एम. एफ. हुसेन यांच्‍या चित्राच्‍या खरेदीबाबत खुलासा केला. त्‍यांना हे चित्र तत्‍कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी खरेदी करण्‍यास सांगितले होते. त्‍यानुसार त्‍यांनी हे चित्र दोन कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर याची विक्री करण्‍यात आली. या पैशातून सोनिया गांधी यांच्‍यावर न्‍यूयॉर्कमध्‍ये उपचार करण्‍यात आल्‍याचे मुरली देवरा यांच्‍या मुलगा मिलिंद देवरा यांनी सांगितले होते, असेही राणा कपूर यांनी ‘ईडी’ला सांगितले.

पद्मभूषण पुरस्कार देण्‍याचे आश्‍वासन

‘ईडी’च्‍या आरोपपत्रात म्‍हटलं आहे की, राणा कपूर यांना एम.एफ हुसेन यांचे चित्र खरेदी करण्‍यास सांगितले. यावेळी त्‍यांना चित्र खरेदी केल्‍यास पद्म भूषण पुरस्‍काराने सन्‍मानित केले जाईल. तसेच व्‍यवसायातही फायदा करुन दिला जाईल, असे आमिषही दाखविण्‍यात आले होते. या चित्र खरेदीबाबत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनीही दबाव आणला होता. चित्र खरेदीस नकार दिल्‍यास गांधी कुटुंबाशी ओळख करुन दिली जाणार नाही. पद्मभूषण पूरस्‍कारही रोखला जाईल, असे त्‍यांनी सांगितले होते, असा आरोपही त्‍यांनी केला.

सध्‍या राणा कपूर व त्‍यांच्‍या कुटुंबीयांवर मनी लॉन्‍ड्रिंगचा गुन्‍हा दाखल आहे. राणा कपूर यांच्‍यावर गौतम थारप यांच्‍या अवंता कंपनीला बेकायदा १९०० कोटी रुपये कर्ज देण्‍याचा आरोप आहे. हे कर्ज देण्‍यासाठी राणा कपूर यांना ३०० कोटी रुपयांची लाच देण्‍यात आली होती, असा दावा ‘ईडी’ने केला हाेता.

हेही वाचा : 

 

Back to top button