Latest

भारतात तुमचं स्वागत, पण ‘मेक इन चायना’ चालणार नाही, गडकरींचा Tesla प्रमुख एलॉन मस्क यांना सल्ला

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी टेस्लाचे संस्थापक आणि प्रमुख एलॉन मस्क (Tesla founder and chief Elon Musk) यांना भारतात त्यांचा उद्योग सुरु करण्याच्या प्रस्ताव दिलाय. रायसीना डायलॉगमध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, भारतात मस्क यांचे स्वागत आहे, परंतु त्यांनी चीनमध्ये तयार केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची भारतात विक्री करू नये. त्याऐवजी त्यांनी देशात विक्री आणि उत्पादन केले पाहिजे.

"मस्क यांचे भारतात स्वागत आहे, पण समजा त्यांना चीनमध्ये उत्पादन करायचे असेल आणि भारतात त्याची विक्री करायची असेल तर तो भारतासाठी चांगला प्रस्ताव असू शकत नाही. त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी भारतात येऊन येथे उत्पादन करावे," असे गडकरी म्हणाले.

जर एलॉन मस्क टेस्ला वाहनांचे उत्पादन भारतात घेण्यास तयार असतील तर कसलीही अडचण नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. "आमच्याकडे सर्व क्षमता आहे, आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळे ते उत्पादनांवरील खर्च कमी करू शकतात," असेही त्यांनी नमूद केले.

"माझी विनंती आहे की तुम्ही भारताला भेट द्या आणि येथेच उत्पादन सुरू करा. भारत एक मोठी बाजारपेठ आहे, बंदरे उपलब्ध आहेत आणि मस्क भारतातून निर्यात देखील करू शकतात," असेही गडकरी पुढे म्हणाले.

गेल्या वर्षी टेस्ला (Tesla) मोटर्सने इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यासाठी आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती. त्यावर अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला कोणत्याही कर सवलतीचा विचार करण्यापूर्वी भारतात उत्पादन सुरू करण्याचा सल्ला दिला होता.

टेस्ला कंपनी अमेरिका आणि चीनमध्ये त्यांच्या वाहनांचे उत्पादन घेते. सोबतच जर्मनीत एका नवीन प्लांटच्या मंजुरीच्या ते प्रतीक्षेत आहेत. एलॉन मस्क नुकतेच सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे मालक झाले आहेत. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि ट्विटर इंक यांच्यामध्ये ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार झालाय.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT