'कॅट' अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (अखिल भारतीय व्यापारी महासंघ) दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'अॅमेझॉन'वर देशविघातक कृत्यातील सहभागाचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटके 'अॅमेझॉन'कडून खरेदी करण्यात आली होती.
या प्लॅटफॉर्मविरुद्ध त्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही 'कॅट'ने केली आहे. बॉम्ब बनविण्यासाठी ज्या रसायनाचा वापर दहशतवाद्यांनी केला, ते रसायन 'अॅमेझॉन' वेबसाईटवरून खरेदी करण्यात आले. या रसायनाच्या वापरातून दहशतवाद्यांनी 'आयईडी' तयार केले होते.
'कॅट'चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपल्या कबुली जबाबात स्फोटके बनविण्यासाठी आवश्यक खरेदी त्यांनी 'अॅमेझॉन'वरून केल्याची कबुली दिली होती. बॅटरीसह अन्य वस्तूंची खरेदीही या दहशतवाद्यांनी 'अॅमेझॉन'वरून केली होती. फॉरेन्सिक तपासणीतही बॉम्बनिर्मितीसाठी अमोनियम नायट्रेट, नायट्रोग्लिसरीन या रसायनांचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
अमोनियम नायट्रेटसारखी निर्बंध असलेली घातक रसायने दहशतवादी सहजगत्या खरेदी करतात. देशविघातक कृत्यांत त्याचा वापर होतो. आपले जवान व निरपराध नागरिक या कृत्यांचे लक्ष्य असतात.
'अॅमेझॉन' वेबसाईटवरून गांजा, मारिजुआनासारख्या अमली पदार्थांची विक्री झाल्याचेही याआधी उघडकीस आले आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. 'एनआयए'च्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा) तपासातून स्फोटकांसाठीची साहित्य खरेदी दहशतवाद्यांनी 'अॅमेझॉन'वरून केली होती. 'अॅमेझॉन'ने त्याचा तपशीलही 'एनआयए'ला दिला आहे.
https://youtu.be/35iiJeCFps4