नीरज चोप्रा 
राष्ट्रीय

नीरज चोप्रा रोड मराठा : महाराष्ट्राच्या मातीशी रक्ताचे नाते!

backup backup

बाळासाहेब पाटील,पुढारी ऑनलाईन : मराठी संस्कृतीच्या खुणा जपणाऱ्या रोड मराठा बांधवांची आज देशाच्या इतिहासात ओळख ठळक झाली आहे ती नीरज चोप्रा या गोल्डनमॅनमुळे. पानिपतच्या लढाईतील प्रचंड नरसंहारानंतर परतीचे मार्ग खुंटले त्यामुळे ते तिथेच राहिले. रोड मराठा म्हणून त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्राच्या अठरापगड जातीतील लोकांचा मिळून तयार झालेला रोड मराठा समाज आज विविध पातळ्यांवर आघाडी घेत आहे. अशा या पराक्रमी समुदायाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

भाऊसाहेब पेशवा, विश्वासराव पेशवा आणि अन्य मराठा सरदारांच्या नेतृत्वाखाली पानिपतच्या भूमीत लढाई झाली. अब्दालीच्या सैन्यांचा पाडाव करण्यासाठी महाराष्ट्रातून लाखोंची फौज गेली होती.

मात्र, दुर्दैवाने पानिपतवर प्रचंड नरसंहार झाला. अनेकांना बंदी बनवून गुलाम म्हणून अब्दालीने काबूलकडे नेले. त्यापैकी अनेकांची मधेच सुटका केली किंवा त्यांना विकले.

पाकिस्तानातील बलुचिस्तान येथेही मराठ्यांच्या फौजेतील काहींचे वास्तव्य आहे, असे संदर्भ इतिहास संशोधकांनी पुढे आणले आहे.

उत्तर भारतात, विशेष करून हरियाणा, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी पेशव्यांच्या फौजेत गेलेल्या अनेकांचे वंशज आजही वास्तव्यास आहेत. या फौजेत असे म्हटले जाते की दीड लाख सैन्यांची कत्तल झाली होती.

मात्र, जे सैनिक वाचले त्यांनी तेथे आसरा घेतला आणि तेथेच स्थायिक झाले. लढवय्या मराठा सैनिकांनी तेथे आपली ओळख निर्माण केली.

जसजशा पिढ्या जातील तशा ते आपली ओळख विसरून गेले. महाराष्ट्रातील संस्कृतीच्या खुणा आजही तेथे आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. वसंतराव मोरे यांनी केलेल्या संशोधात प्रथम रोड मराठा समाजाचा उल्लेख झाला.

त्यानंतर या समाजाचे अनेक लोक कोल्हापूर, रायगड आणि महाराष्ट्रातील आपल्या पूर्वजांच्या खुणा शोधण्यासाठी आले. महाराष्ट्राशी त्यांचे खूप भावनिक नाते आहे.

नीरजचे पूर्वज महाराष्ट्रातील

नीरज चोप्रा यांचे पूर्वजही महाराष्ट्रातील आहेत. रोड मराठ्यांच्या नावांचा अपभ्रंश होऊन उत्तर भारतातील आडनावांशी साधर्म्य ठेवणारे आहे. मात्र, नीरज यांचे वडील रोड मराठा असल्याचे सांगतात.

तसेच त्याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण रोड मराठा आहोत आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे असे सांगितले होते.

काही शतकांपूर्वी पानिपतच्या लढाईत त्यांच्या पूर्वजांनी तलवार हातात घेऊन पानिपतावर कर्तबगारी गाजवली.

आज त्याच मातीत नीरजने भाला हातात घेऊन भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली.

एकत्र कुटुंब

नीरजचे वडील शेतकरी असून त्यांची आई गृहिणी आहे. त्याला दोन लहान बहिणी असून एकत्र कुटुंब आहे.

त्याच्या गावात खेळासाठी पोषक वातावरण नसल्याने १४ व्या वर्षी त्याने घर सोडले. सरावामुळे त्याचे औपचारिक शिक्षण विस्कळित झाले.

आता त्याचे स्वप्न आहे की घरातल्या सर्वांना पंचकुला येथे आणायचे, जेणेकरून त्याला सरावासाठी धावपळ करावी लागणार नाही.

हरियाणातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्तरावर जिंकत आहेत पण माझे गाव अजूनही त्यात नाही ही खंत त्याला होती.

मात्र, त्याच्या पदकाने ती खंत पुसून टाकली आहे.

८८ किलो वजनाचा त्रास

नीरज लहानपणी लठ्ठ होता. वयाच्या ११ व्या वर्षी त्याचे वजन ८८ किलो होते. वजन कमी व्हावे म्हणून तो पानिपतच्या स्टेडियमवर व्यायाम करण्यासाठी जात होता.

वजन कमी व्हावे म्हणून तो धावत असे. मग एके दिवशी भालाफेक प्रकारात हरियाणाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जयवीरने त्याला भाला फेकण्यास सांगितले.

त्याने तो फेकला आणि तो दूर गेला. त्यामुळे त्याला आपल्या क्षमतेचा अंदाज आला. १४ व्या वर्षी प्रथमच त्याने सिंथेटिक ट्रॅकवर सराव केला

आणि २०१२ मध्ये तो लखनौला अंडर ज्युनिअर स्पर्धेत खेळला.

तेथे त्याने ६८.४६ मीटर भाला फेकून राष्ट्रीय विक्रम मोडला.

जखमी झाल्याने वजन वाढले

त्यानंतर पंचकुला येथे मित्रांबरोबर बास्केटबॉल खेळत असताना त्याच्या हाताचा अंगठा फुटला. मणगट फ्रॅक्चर झाले.

त्यामुळे सराव थांबला. ज्या हाताने भाला फेकला जायचा त्या हातालाच जखम झाली होती.

मग तो घरी परतला. आणि सराव नसल्याने त्याचे वजन ८२ वरून ९३ वर गेले तरीही त्यावर मात केली.

याबाबत बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे म्हणाले, 'पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठे देशाच्या रक्षणासाठी लढाईसाठी गेले होते. त्यांना काही अडचणींमुळे पराभव पत्करावा लागला होता. मात्र, तेव्हा युद्धाचे उद्देश जिंकले.

पुढे अनेक वर्षे मराठ्यांनी देशावर सत्ता गाजवली. पानिपतच्या युद्धात हरल्यानंतर एक टोळी जंगलात लपून बसली होती. ते गावात येताना त्यांनी मराठा ही ओळख सांगितली नाही कारण त्यांना धोका होता. त्यांनी रोड समाजाचे असल्याचे सांगितले.

पुढे त्यांच्याकडे प्रत्येक गावाच्या संरक्षणाची जबाबदारी या समाजाकडे आले. आज हरियाणातील १९ टक्के जमिनी रोड मराठ्यांकडे आहेत. या समाजाची मुले प्रामुख्याने सैन्यात आहेत. आता ते मराठा लाइट इन्फट्रीत आहेत. हरियाणातील आयएएस अधिकारी वीरेंद्र मराठा वर्मा यांनी या जातीचा शोध घेतला.

या समाजातील लोक शिंकताना 'छत्रपती की जय' असे म्हणत. हा एक धागा पकडून त्यांनी संशोधन केले. त्यानंतर आम्ही प्रचंड शोध घेतला. कुंजीपुरा येथे २०० भोसले आहेत. तेथे चोपडे आडनावाचे लोक आहेत त्यांना चोपडा, पाटील यांना पटेल असे अपभ्रंश करून शब्द वापरले गेले.

तेथे जोंधळे आडनावाचे अनेक लोक आहेत. हा समाजा लढवय्या आणि राष्ट्रासाठी प्राणपणाने लढला आज नीरजचे यश हे लढावूपणाचे यश आहे.'

हेही वाचले का:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT